पुणे: ‘‘मी माझ्या मुलांना गोष्टी सांगता सांगता सुचलेला हा चित्रपट आहे. मुलांना गोष्टी सांगताना त्यातून खूप नाजूक संदेश देता येतो. ‘एकदा काय झालं...’ या चित्रपटाचे श्रेय माझ्या मुलांना आहे. त्यांना गोष्टी सांगताना हा चित्रपट तयार होऊ शकला आणि आपण कोणत्याही गोष्टीची सुरवात ‘एकदा काय झालं...’ असंच करतो. त्यामुळेच चित्रपटाचे नावच ते दिले. याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्याचा खूप आनंद होत आहे,’’ अशा भावना संगीतकार, लेखक, दिग्दर्शक सलिल कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्रीय पुरस्कारांची गुरूवारी (दि.२४) घोषणा करण्यात आली. त्यामध्ये ‘एकदा काय झालं...’याला सर्वात्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संगीत देणारे सलिल कुलकर्णी यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
कुलकर्णी म्हणाले,‘‘मी चित्रपटाची पटकथा लिहून झाल्यावर मुख्य भूमिकेसाठी पहिला चॉइस सुमीत राघवन हाच होता. कारण मुळात मुलांशी बोलताना तितका प्रेमाने बोलणारा कलाकार हवा होता. मोठ्यांशी खोटं बोलता येत नाही. कारण मुलांना ते लगेच समजते. सुमीत हा अतिशय जीवंत आणि प्रेमळ आहे. तो मला चित्रपटासाठी हवा होता आणि मिळाला.’’
चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, संगीत असं सर्व बाजू कशा सांभाळल्या याविषयी ते म्हणाले,‘‘ मी जेव्हा लेखक असतो, तेव्हा लेखनावर लक्ष असते. लेखन संपल्यावर गाणी लिहिताना गाण्यावर लक्ष केंद्रीत केले. मग शूट करताना कोणी तरी गाणी लिहिली आहेत, ते आपल्याला शूट करायची आहे, असं मनात होतं. मी चित्रपटात कुठेही अनावश्यक गाणं लिहिली नाहीत. संदीप खरे यांनेही गाणं लिहिली आहेत. गाणं सुरू झाल्यावर लोकांनी व्हॉट्सॲप पाहता कामा नये. ते पाहूनच गाणी लिहिली. चित्रपटासाठी प्रत्येकाने चांगलं काम केलं आहे. टीमच छान होती. म्हणून चित्रपट चांगला झाला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचा खूप आनंद झाला.’’
चित्रपटासाठी सुमीत राघवनच्या मुलाची भूमिका करणारा मुलगाही सोजवळ हवा होता. त्याच्या मी शोधत होतो. त्यासाठी १५०० जणांच्या ऑडिशन घेतल्या, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.