अशा अनिश्चिततेच्या काळामध्ये मनाची तयारी करून पद्धतशीरपणे प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी काही सूचना उपयुक्त ठरू शकतात.
- प्रवेशपूर्व परीक्षा देणा-या प्रत्येक विद्यार्थ्याने हे लक्षात घ्यावे की, प्रवेश परीक्षा या अपरिहार्य असून त्या पुढील काही महिन्यांत निश्चितपणे पार पडतील.
- विद्यार्थ्यांना त्यांची पात्रता व गुणवत्तेनुसार प्रवेश मिळवून देण्यासाठी सरकारकडे पूर्व परीक्षांशिवाय कुठलीही यंत्रणा नाही. त्यामुळे प्रवेश परीक्षा निश्चित घेतल्या जातील. बारावीच्या परीक्षांप्रमाणे रद्द होणार नाहीत.
- सध्या उपलब्ध झालेल्या अतिरिक्त वेळेकडे विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. या वेळेचा वापर प्रवेश परीक्षांची तयारी अधिक फलदायी करण्यासाठी झाला पाहिजे. आपल्याला अवघड वाटणा-या विषयांचा पुन्हा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे.
- हा वेळ अधिक सराव चाचण्या देऊन परीक्षेबाबतची आपली नियोजन आणि रणनीती अधिक सुधारण्यासाठी वापरला पाहिजे.
- प्रवेशपूर्व परीक्षांसाठी आपण करत असलेला अभ्यास फक्त या परीक्षांसाठी नसून याचा उपयोग पदवी अभ्यासक्रमांसाठी पाया निर्माण करण्यात उपयुक्त ठरतो. त्यामुळे परीक्षेची कुठलीही स्पष्ट तारीख नसताना अभ्यास करणे फलदायक ठरणार नाही, असे समजू नका.
- सातत्याने अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांना कंटाळा आला असेल तर त्यांनी थोडाकाळ विश्रांती घ्यावी. आपल्या आवडीच्या गोष्टी कराव्यात. त्यानंतर पुन्हा ताजेतवाने होऊन प्रवेश परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा.
विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य किंवा संभ्रम निर्माण झाला असेल तर मनोबल वाढविण्यासाठी व ऊर्जा निर्माण करण्यासाठी दैनंदिनीमध्ये व्यायाम, योगा, प्राणायाम अथवा ध्यानधारणा करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुन्हा अभ्यासाला लागणे अधिक सोपे जाईल.
गेल्या काही वर्षांमध्ये प्रवेश परीक्षांमधील बहुतांश विद्यार्थ्यांची सरासरी कामगिरी अतिशय खराब दिसून आली आहे. प्रत्येक वर्षी एमएचटीसीईटीमध्ये सुमारे ९३ टक्के विद्यार्थ्यांना ५० टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहेत, जेईई मेन्समध्ये सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांना २५ टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहेत. तसेच नीटमध्ये ९० टक्के विद्यार्थ्यांना ५० टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहेत. या आकडेवारीवरून असे दिसून येते की दरवर्षी बहुतांश विद्यार्थी हे या परीक्षांची योग्य तयारी करत नाहीत. त्यामुळे यावर्षी उपलब्ध झालेला अतिरिक्त वेळ हा परीक्षेच्या तयारीसाठी अधिक चांगल्या पद्धतीने वापरून विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करून दाखवता येऊ शकते.
- दुर्गेश मंगेशकर, प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक
-------------------------------