बहुधा दर शुक्रवारपासून रविवारपर्यंत अजित पवार जिल्ह्यात असतात. पुणे, बारामती, जिल्ह्यात अन्यत्र असे त्यांचे कार्यक्रम लागलेले असतात. विशेष म्हणजे सकाळी साडेसहापासूनच त्यांचे कार्यक्रम चालू होतात. पण अजितदादांना कार्यक्रमाला बोलवायचे म्हणजे आयोजकांना फार तत्पर राहावे लागते. नीटनेटकेपणाची, स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते. कारण अजितदादांच्या नजरेतून काही सुटत नाही. मग त्यांच्या सडेतोड फटकाऱ्यांचा तडाखा झेलावा लागतो. जिल्हाधिकारी कार्यालयात असाच प्रसंग घडला. राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या ऑनलाईन कार्यक्रमासाठी अजित पवार आले होते. पालकमंत्री कार्यालयात येत असल्याचे पाहून अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी महसूल कोर्टाच्या सुनावणीसाठी विकसित केलेल्या ‘एक्युजे कोर्टा’ची ऑनलाईन प्रणाली पाहण्यासाठी पवारांना आमंत्रित केले. आपल्या कार्यालयाबाहेर लावलेला सुनावण्यांचा ‘ऑनलाईन’ फलक दाखवण्यासाठी ते पवारांना घेऊन आले. झाले भलतेच. त्या फलकाऐवजी पवारांची नजर इकडेतिकडे भिरभिरली आणि सरकारी रंगरगोटीचा बुरखा फाटला. वकिलांना बसण्यासाठी ठेवलेल्या दोन तुटक्या खुर्च्यांवर पवारांची नजर गेली. ‘तुटक्या खुर्च्या येथे कशा?’, ‘कोपऱ्यात जाळ्या किती झाल्यात?’ ‘पीओपी तुटलेले कसे?’ असे प्रश्न पडून पवार खूपच चिडले. हे कमी की काय म्हणून त्यातच त्यांच्या पायाला कोपऱ्यातल्या तुटलेल्या फरशीचा तुकडा लागला. मग त्यांच्या पद्धतीने ते बरसले आणि ‘पंधरा दिवसांत मला हे सगळे दुरुस्त झालेले हवे. पुण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि असली दशा शोभणारी नाही. सुधरा लवकर,” असे सुनावत अजित पवारांनी काढता पाय घेतला.
कुजबूज १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:08 AM