महाराष्ट्र साहित्य परिषद नामक एक संस्था मायमऱ्हाटीला ऊर्जितावस्था आणणेचे विशाल हेतूने कार्यरत असलेची खबर किती मराठीजनांना आहे हे नेमकेपणाने सांगणे फार कठीण. महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यातील टिळक पथावर या संस्थेचे कार्यालय आहे. संस्थेचा इतिहासही दांडगा. परंतो मायमऱ्हाटीसाठी या संस्थेेचे सध्या नेमके काय चालले आहे, या संस्थेचा सध्याचा प्रभाव किती आणि कोणावर, या संस्थेची धुरा सध्या सांभाळणाऱ्यांचे मराठी भाषेतील योगदान काय वगैरे प्रश्नांसाठी आगामी मराठी साहित्य संमेलनात दिवसभर चर्चा केली तरी ती पुरी न पडावी. ते काहीही असले तरी या संस्थेत पदाधिकारी म्हणून राहण्यासाठी मोठी झुंबड उडते. एकदा का ते मिळाले की वर्षानुवर्षे मंडळी तेथेच चिकटून राहात असल्याचा अनुभव आहे. असे चिकटून राहण्यासाठी मग अनेक कारणे सांगितली जातात. आता कोरोनाचे कारण आयतेच लाभले. वास्तविक कोरोनाची भीती टाकून देत जग नव्या उत्साहाने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये रत होऊ लागले आहे. मात्र सदाशिव पेठेतल्या खुराड्यात मऱ्हाटीचा कारभार थाटून बसलेल्या मसापच्या पदाधिकाऱ्यांनी त्याकडे सोईस्कर डोळेझाक केली आणि कोरोनाची सबब देत स्वत:चा कार्यकाळ वाढवून घेतला. मऱ्हाटी भाषेसाठी वा साहित्यात भरीव योगदान देता येवो अथवा न येवो, पण परिषदेतल्या खुर्च्या झिजवण्यातले योगदान कमी पडता कामा नये, असाच त्यांचा हेतू असावा. आता हे सगळे आम्ही कशाला बोलू? त्याच खुराड्यातले काहीजण आमच्या कानी येऊन या वार्ता देतात. त्याही नावानिशी. असो. मऱ्हाटीच्या नावे चालू असलेल्या या खुराड्यातील वातावरण नुकतेच पुन्हा एकदा गढूळले. त्याला निमित्त झाले ते काहींची मुदतवाढ रद्द करण्याचे. ज्यांना वगळले ती मंडळी गेली दहा-पंधरा वर्षे तेथेच ठाण मांडून आहेत म्हणे. मग या ना त्या पदाच्या निमित्ताने मसापत कोण किती वर्षे चिकटून आहेत ते कोण मोजणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यालाच ‘मनमानी’ म्हटले जात आहे.
..............
नानांच्या डरकाळ्यांमुळे पोटात गोळा
महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींकडून मान्यच करून आणले आहे. हीच बाब ते आता राज्यभर फिरून ठासून सांगत आहेत. नानांच्या स्वबळाच्या डरकाळ्यांमुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या पोटात मात्र गोळा आला आहे. विदर्भवासी असलेल्या नानांच्या प्रदेशात कॉंग्रेसचा जीव टिकून आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातली स्थिती पूर्ण वेगळी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आक्रमकतेपुढे कॉंग्रेस कशीबशी टिकून आहे. त्यातही पवारांच्या पुणे जिल्ह्यातली स्थिती आणखी बिकट. सुरेश कलमाडींसारखा नेता बाजूला झाल्यापासून पुण्यातले कॉंग्रेसजन फक्त गतवैभवाच्या आठवणींचे उसासे सोडत राहतात. ज्येष्ठ म्हणवणारे नेते केव्हाच लोकांपासून तुटले आहेत. सत्तेत असताना गटबाजीची झळ सत्तेच्या आवरणाखाली पूर्वी झाकून जायची, पण आता ही गटबाजी पक्षाला गटांगळ्या खायला लावते. त्याचाच फटका २०१४ पासूनच्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत सतत बसत आला आहे. कॉंग्रेसमध्ये भवितव्य दिसत नसल्याने पक्ष सोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण हे नानांना सांगणार कोण? कार्यकर्ता जिवंत ठेवण्यासाठी स्वबळाचा निर्णय घेतल्याचे नानांनी जाहीर केले. पण पाठीशी कार्यकर्ते किती आहेत आणि कोण आहेत याचा त्यांनी अदमास नीट घेतला का, असा प्रश्न कट्टर कॉंग्रेसवाले विचारत आहेत.