कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असताना रुग्णसंख्या अपेक्षित प्रमाणात कमी झाली नव्हती. पॉझिटिव्हिटी रेट दोनच्या खाली घसरायचा होता. तोवरच व्यापारीवर्ग, आमदार व अन्य प्रमुख लोकप्रतिनिधी लॉकडाऊनचे निर्बंध खुले करण्याची आग्रही मागणी राज्य सरकारकडे करत होते. त्याची आठवण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साप्ताहिक आढावा बैठकीत काढलीच. “तुम्ही सर्व आमदार सर्व खुले करा, वेळ दहा वाजेपर्यंत वाढवा, वेळ वाढवली तरी गर्दी कमी होईल असं म्हणत होता. तरी मी, मुख्यमंत्री आम्ही सगळेच सांगत होतो थोडं दमानं घेऊ....पण नाही...आता परत रुग्णसंख्या वाढू लागलीय तर म्हणता, लसीकरण वाढवलं पाहिजे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता तुम्हीच पहा काय होते? काय चाललंय?” या शब्दांत अजित पवार यांनी त्रागा व्यक्त केला. त्यांच्या बोलण्यात थोडं तथ्य आहे. कोरोना रुग्णांची संख्या पूर्णत: कमी झालेली नाही. पण म्हणून घरी किती दिवस बसणार? व्यवसाय, व्यापार, छोटे-मोठे दुकानदार सगळ्यांचाच धंदा बसला आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर मृत्यूचा धोका खूप कमी होतो असं दिसतंय. त्यामुळं आता सगळा गाडा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावा लागेलच ना. कोरोना बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी याच अजितदादांनी बारामतीत सांगितलं, ‘कोरोना काळात राज्याच्या सरकारी तिजोरीत तब्बल दीड लाख कोटी रुपयांची तूट आली आहे.’ त्यामुळं आता अजितदादांनाच सांगावं लागेल, “निर्बंध लादण्याबाबत तुम्हीच जरा घ्या दमानं.”
------------
संरक्षणमंत्र्यांची ‘ऐतिहासिक’ चूक
इतिहासातील तपशीलांचा उल्लेख करताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या राष्ट्रपुरुषाबद्दल बोलताना कमालीचं भान पाळणं आवश्यक आहे. त्यातही महाराष्ट्रात आणि पुन्हा पुण्यात शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं तर अभ्यासच हवा. संरक्षणमंत्री राजनाथसिंह नुकतेच पुण्यात येऊन गेले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या बालपणीचा उल्लेख केला. समर्थ रामदास हे संतकवी छत्रपती शिवरायांच्या बालपणात त्यांच्या सोबत असल्याचे संरक्षणमंत्र्यांच्या भाषणातून ध्वनित होत होते. वास्तवात असा दाखला इतिहासात कोठेही नाही. पूर्वी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या राजनाथसिंह यांनी इतिहासाचा उल्लेख करताना थोडी अधिक तयारी केली असती तर बरे झाले असते.
---------------------