रामभाऊ म्हाळगी हे जनसंघाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस. जनसंघाचे ते विधानसभेतील पहिले आमदार. पुढे भाजपची स्थापना झाल्यानंतर ते महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष झाले. रामभाऊंचे सामाजिक-राजकीय कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असले, तरी त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातला आणि पुण्यातून ते विधानसभेवर निवडून जात असल्याने पुणे ही त्यांची कर्मभूमीही. स्वाभाविकपणे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुुरुवात पुण्यातून झाली. या निमित्ताने त्यांच्या आठवणींना आता वर्षभर उजाळा दिला जाईल. रामभाऊ ज्या काळात समाजकारणात होते तो काळ वेगळा होता. लढाई विचारांची असे. त्यात व्यक्तिगत द्वेष, आकस, कमरेखालचे वार यांना स्थान फारसे नसे. स्वत: रामभाऊ याच नीतीमत्तेने वागणारे होते. त्यामुळे सर्व पक्षांमध्ये त्यांनी मित्र जोडले होते. एवढेच काय प्रतिस्पर्ध्याशीही त्यांचे मित्रत्वाचे संबंध असत. म्हणूनच तर सन १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत वसंतराव थोरात यांनी शुक्रवार पेठ मतदारसंघातून म्हाळगी यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतरही जनसंघाच्या कार्यालयात जाऊन म्हाळगी यांचा हार घालून सत्कार केला. तोही शेकडो जणांच्या उपस्थितीत तांबडी जोगेश्वरी येथील जनसंघाच्या कार्यालयात जाऊन. ही परंपरा पुण्यात अजूनही बऱ्यापैकी टिकून आहे. पुण्यातली राजकीय संस्कृती अजून तरी वैराच्या वळणावर गेलेली नाही. विरोधी पक्षांमधले नेते-कार्यकर्ते अजूनही पेठांमध्ये, चौकात, कट्ट्यांवर एकमेकांशी सौहार्दाने वागताना दिसतात. गणेशोत्सवात हेच राजीकय कार्यकर्ते पक्षांचे झेंडे उतरवून आनंदाने सहभागी होताना दिसतात. रामभाऊ म्हाळगी जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाला भाजपाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमातही त्यांनी म्हाळगी यांची आठवण सांगितली. ते ऐकून विरोधी पक्षातल्या एका जुन्या नेत्याने पुणेरी टोमणा मारलाच. ते म्हणाले, “राजकारण करत असताना वैरवृत्ती जपू नये हे लक्षात ठेवण्यासाठी रामभाऊ म्हाळगी, एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, मोहन धारिया यांच्यासारख्या नेत्यांच्या आठवणी ठेवायच्या असतात. रामभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने भाजपाने एवढा धडा घेतला तरी ईडीसारख्या अनेक तपास यंत्रणांचा ताप कमी होईल.”
अजितदादा...याकडे कधी बघणार?
एकीकडे व्यापारी वर्ग शनिवार-रविवारचे निर्बंधही कमी करा अशी मागणी करत होता. छोटे विक्रेते, व्यावसायिक, दुकानदार व्यवहाराच्या वेळा रात्री आठपर्यंत करण्याची मागणी करत होते. यावर काही निर्णय होईल, या अपेक्षेने पुणेकर शुक्रवारच्या कोराेना आढावा बैठकीकडे डोळे लावून बसले होते. या मागण्यांची दखल घेणे सोडाच, पण उलट पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांनाच सज्जड इशारा दिला. ते म्हणाले, “दुपारी चारनंतर पुण्याच्या रस्त्यांवर कोणी दिसता कामा नये.” लसीकरण झालेल्यांमध्ये बेफिकिरी वाढत असल्याचेही निरीक्षण या आढावा बैठकीत नोंदविण्यात आले. यात तथ्य नाही असे नाही. पण सगळे नियम फक्त सर्वसामान्यांनाच का? पोलिसांची कार्यतत्परता फक्त सामान्य पुणेकरांच्या बाबतच का? असे प्रश्न पुणेकर विचारू लागले आहेत. कारण, गेल्याच आठवड्यात भाजपचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, कॉंग्रेसचे नाना पटोले, शिवसेनेचे संजय राऊत आदी मंडळींनी पुणे परिसरात अनेक कार्यक्रम घेतले. काहींची आंदोलने चालू आहेत. या राजकीय गर्दीमध्ये ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते ना सर्वांनी मास्क परिधान केलेला असतो. पण, या राजकीय मंडळींना कायद्याचा बडगा दाखवण्याचे धाडस अजित पवाारांचे पोलीस दाखवत नाहीत. म्हणूनच पुणेकर विचारत आहेत, ‘अजितदादा...याकडे कधी बघणार?’
पुण्यात फडकला इंग्लंडचा ध्वज
पुणे हे क्रीडाप्रेमी शहर आहे. कोरोनाच्या दीड वर्षाच्या सक्तीनंतर तर खेळांबद्दलची पुण्याची ही ओढ जरा जास्तच वाढली आहे. त्यामुळेच रविवारकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. रविवारची सकाळ उजाडेपर्यंत कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाने बाजी मारली की ब्राझीलने हे स्पष्ट झालेले असेल. रविवारच्या संध्याकाळी विम्बल्डन पुरुष एकेरीत जोकोविच विक्रम रचणार का याकडे टेनिसप्रेमी डोळे लावून बसतील. मध्यरात्रीनंतर युरो फुटबॉल चषकात इंग्लंड आणि इटली एकमेकांविरोधात झुंजतील. खरे तर या तिन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघ कुठेच नाही. तरी पुण्यात पैजा लागल्या आहेत. वेगवेगळ्या संघांना पाठिंबा देणाऱ्या ‘फॅन्स’नी सामन्यांचा विविध खाद्यपदार्थांचा आणि पेयांचा आनंद लुटत ‘सुपर संडे’ कसा साजरा करायचा, याची जय्यत तयारी केली आहे. एवढेच काय कॅम्प मधल्या एका इंग्लिश चाहत्याने घरावर चक्क इंग्लंडचा ध्वजच झळकावला आहे. इंग्लंडने इतिहासात पहिल्यांदाच ‘युरो’ची अंतिम फेरी गाठल्याने इंग्लंडमध्ये ‘कमिंग होम’चे नारे घुमू लागले आहेत. त्याचा प्रतिध्वनी आता कॅम्पातही उमटला आहे तो असा.
पुण्यातले ‘भास्कर जाधव’
दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेत काम पाहिले. भाजपाच्या बारा आमदारांना निलंबित केल्याने त्यांची ही दोन दिवसांची अत्यल्प कारकीर्द इतिहासात नोंदली गेली. पण त्यामुळे आता भास्कर जाधव यांना याच पदी बसावे असे वाटू लागले आहे. ‘पक्षाने आदेश दिल्यास’, ‘कॉंग्रेसने मंत्रिपदाच्या बदल्यात विधानसभा अध्यक्षपदावरचा ताबा सोडल्यास’ अशी जर-तरची भाषा करत भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षपदी बसण्याचा मनोदय बोलून दाखवलाच. अर्थात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जराही वेळ न दवडता भास्कररावांची इच्छा जागीच मोडून टाकली. ‘कॉंग्रेसकडेही अनेक भास्करराव आहेत,’ असे सूचक विधान त्यांनी केले. थोरातांच्या या विधानामुळे पुण्यातल्या भोर प्रांतीचे कॉंग्रेसमधले ‘भास्करराव’ खूषही झाले आणि चिंतीतही. खूष अशासाठी की कॉंग्रेसने विधानसभा अध्यक्षपद अजिबात सोडणार नसल्याचे स्पष्ट केले यासाठी. चिंता ही की थोरात म्हणाले ‘आमच्याकडेही अनेक भास्करराव आहेत.’ अनेक म्हणजे स्पर्धा आली. मंत्रिपद नाही तर किमान विधानसभेचे अध्यक्षपद तरी मिळेल अशी आशा जिल्ह्यातल्या कॉंग्रेसजनांना आहे. भोर प्रांतातून यासाठी मोर्चेबांधणीही झालेली आहे. आता मुहूर्त लागतो कधी ते पाहायचे.