पुणे : कंजारभाट समाजातील मुला-मुलींमध्ये लग्नापूर्वी शारीरिक संबंध झाल्यास त्याचे प्रायश्चित करण्यासाठी त्यांना अघोरी शिक्षेला सामोरे जावे लागते. मुलीच्या शुध्दीकरणासाठी दुर्गम भागात नेले जाते. तिला पांढरा कपडा गुंडाळायला दिला जातो. पिठाचे गरम गोळे तिच्यासमोर टाकले जातात आणि तिने त्याच्यावर चालायचे असते. तिला मागून समाजातील माणसांकडून दगड मारले जातात...या अमानवीय क्रौर्याची अंगावर काटा आणणारी कहाणी कंजारभाट समाजातील या प्रथेविरूद्ध आवाज उठविल्यामुळे बहिष्कृत झालेला तरूण सिद्धार्थ इंद्रेकर याने कथन केली. कंजारभाट समाजातील तरूणींना लग्नापूर्वी द्याव्या लागणा-या कौमार्य चाचणीनंतर समाजातीलच तरूण-तरूणींमध्ये लग्नापूर्वी शारीरिक संबंध आल्यास त्या तरूण-तरूणींना सामोरे जावे लागणा-या अमानुष शिक्षेचा वृत्तांत त्याने शुक्रवारी पत्रकारांसमोर मांडला. समाजातील तरूण-तरूणींनी अशा कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा केला तर काय शिक्षा द्यायची याबाबत कंजारभाट सहन्समल भांतू घटना समिती नावाची पुस्तिका तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही पुस्तिका तयार करणारे सुशिक्षित लोकच आहेत. या गुन्ह्यातील प्रायश्चित म्हणून तरूणीबरोबरच तरूणाचेही शुद्धधीकरण केले जाते.मी हे केले नाही असे तो म्हटला तर उकळत्या तेलात नाण टाकून त्याला काढायला सांगितले जाते ती एकप्रकारे त्याची परीक्षा असते. ते नाणे बाहेर काढताना त्याचे हात भाजले तर तो दोषी समजला जातो आणि भाजला नाही तर दोषी नाही असा अजब तर्क लढविला जातो...या अमानुष शिक्षेबाबत सिद्धांत सांगत होता. कंजारभाट समाजातील प्रथेला समाजतीलच अनेक तरूण-तरूणांनी विरोध केला आणि त्याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी समाजतीलच विवेक तमायचीकर या तरूणाने दीड वर्षांपूर्वी स्टॉप द व्हीरिच्युअल नावाचा व्हॉटसअप ग्रुप तयार केला आहे. सुरूवातीला या ग्रुपमध्ये १००जणांचा समावेश होता. मात्र जातपंचायतीच्या दबावामुळे कुटुंबांनी तरूण-तरूणींना या ग्रुपमधून बाहेर पडण्यास भाग पाडले आहे. आता ४० जणच त्या ग्रुपमध्ये आहेत. जातपंचायतीच्या कौमार्य चाचणीची पहिली तक्रार मी केली होती. पुरावे गोळा केले आणि ते पोलिसांना दिले. जातपंचायतीविरूद्ध २०तक्रारी समोर आल्या असल्याचे तो म्हणाला. -----------------------------------------------------------------------------------------------------