पुणे : स्वारगेट ते कात्रजपर्यंत बीआरटी मार्गावर संचलनासाठी आवश्यक बस उपलब्ध होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ताफ्यात बस आणण्यासाठी केलेल्या नियोजनानुसार त्यासाठी चार-पाच महिन्यांचा कालावधी जावा लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत हा मार्ग पांढरा हत्तीच ठरण्याची शक्यता आहे. ‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत सुमारे एक हजार बसला हिरवा कंदील देण्यात आला आहे. या बस पुढील वर्षभरात ताफ्यात दाखल होतील. त्यापैकी ४०० सीनजी बस विकत घेतल्या जाणार असून त्यापैकी ५० बस १५ जानेवारीपर्यंत मिळतील. सर्व बस मिळण्यासाठी जुलै महिना उजाडावा लागणार आहे. तर ४४० सीएनजी बस भाडेतत्वावर घेण्याचे नियोजन आहे. या बस यायला सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल. एसी १५० ई-बसही एप्रिलअखेरपर्यंत मिळणार आहेत. सर्व बस टप्प्याटप्याने येणार असल्याने या बसचे बीआरटी मार्गासाठी नियोजन करताना पीएमपी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. शहरातील पहिला बीआरटी मार्ग असलेल्या स्वारगेट-कात्रज मार्गाचा पुर्नविकास केला जात आहे. त्यामुळे या मार्गावर बस संचलन होत नाही. अद्याप काम पुर्ण होण्यास बराच कालावधी लागणार आहे. पण सध्या पीएमपीकडे बीआरटी योग्य बसची संख्या कमी असल्याने हा मार्ग सुरू होऊनही उपयोग होणार नाही. सध्या पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये बीआरटीचे पाच मार्ग आहेत.या मार्गांसाठी जवळपास ६०० बसचे नियोजन केले जाते. सर्वाधिक २२७ बस नव्याने सुरू झालेल्या दापोडी ते निगडी मार्गासाठी आहेत. तर येरवडा व वाघोली मार्गावर १५१, सांगवी फाटा ते किवळे मार्गावर ११८,संगमवाडी ते विश्रांतवाडी मार्गावर ६६ तर नाशिक फाटा ते वाकड मार्गावर १५ बस आहेत. पण दररोज या मार्गांवर ४०० ते ४५० बस संचलनात असतात. त्यामुळे नियोजन कोलमडते. बीआरटी मार्गासाठी डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजा असलेल्या बस सोडाव्या लागतात. सध्या ‘पीएमपी’च्या मालकीच्या सुमारे ३०० बस या प्रकारच्या असून ठेकेदारांकडील ६५३ बस बीआरटी योग्य आहेत. पण बसची उपलब्धता आणि गरज यामध्ये खुप व्यस्त प्रमाण आहे. ------------------स्वारगेट ते कात्रज मार्गावर सर्वाधिक बस संचलन सुरू असते. हा मार्ग पीएमपीच्या दृष्टीने महत्वाचा आणि उत्पन्न मिळवून देणारा आहे. लांबपल्याच्या अनेक गाड्या या मार्गावरून धावतात. दररोज ३५० हून अधिक बस या मार्गावर ये-जा करतात. पण बीआरटी मार्गाचे काम पुर्ण झाल्यानंतर त्यावरून बस सोडण्यासाठी उपलब्ध होणार नाहीत, असे पीएमपी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. संचालक मंडळाने केलेल्या नियोजनानुसार आवश्यक बस उपलब्ध होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ७५ कोटी रुपये खर्चून पुर्नविकास होत असलेला या मार्गाचा पुर्ण क्षमतेने वापर होणार नाही. त्यासाठी काही महिने वाट पाहावी लागणार असल्याने तोपर्यंत हा मार्ग पांढरा हत्तीच ठरणार आहे.
स्वारगेट बीआरटी ठरणार पांढरा हत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 12:13 PM
‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत सुमारे एक हजार बसला हिरवा कंदील देण्यात आला आहे.
ठळक मुद्देसध्या पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये बीआरटीचे पाच मार्गएसी १५० ई-बसही एप्रिलअखेरपर्यंत मिळणार सुमारे ३०० बस या प्रकारच्या असून ठेकेदारांकडील ६५३ बस बीआरटी योग्य सर्व बस मिळण्यासाठी जुलै महिना उजाडावा लागणार