पुणे : शहरातला कचरा शहरातच जिरविण्यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून, विविध प्रकल्प सुरू केले. शहरातील २६ प्रकल्पांची तब्बल २ हजार १२५ मे.टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असता, सध्या केवळ ५३० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याचे घन कचरा विभागाकडून मिळालेल्या माहितीमुळे उघडकीस आले आहे. या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीवर देखील कोट्यवधी रुपये खर्च होत असताना हे प्रकल्प पांढरे हत्ती ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोला आग लागल्याने व येथील स्थानिक नागरिकांनी कचरा प्रश्नावर आंदोलन सुरू केल्याने, गेल्या आठ दिवसांपासून शहरातील कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. फुरसुंगी येथे कचरा टाकून दिला जात नाही अन् महापालिकेचे कचरा प्रकल्प शेवटची घटका मोजत आहेत. यामुळे शहरातील कचरा पेट्या ओसांडून वाहत असून, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या पाच-सहा वर्षांत शहरात सुरू करण्यात आलेल्या कचरा प्रकल्पाची माहिती घेतल्यानंतर वरील वस्तुस्थिती समोर आली.फुरसुंगी ग्रामस्थांच्या प्रचंड विरोधानंतर व न्यायालयाच्या निर्णयानंतर, सन २००७ नंतर येथे कचऱ्याचे ओपन डम्पिंग थांबविण्यात आले. त्यानंतर केंद्र शासनाच्या मदतीने येथे २००८ मध्ये सुमारे १ हजार क्षमतेचा हंजर कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला. तांत्रिक कारणे व अकुशल कामगार यामुळे सन २०११ मध्ये हा प्रकल्प बंद पडला. या प्रकल्पांवर केंद्र शासनाच्या वतीने तब्बल २३ ते २४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर, महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी ३३ लाख रुपये खर्च करण्यात आला. फुरसुंगीच्या ग्रामस्थांकडून वारंवार आंदोलन सुरू झाल्याने उशिरा जागे झालेल्या महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली; तसेच याच वेळी पर्यायी जागेचा शोधदेखील सुरू केला. हडपसर येथे अजिंक्य टप्पा एक व टप्पा दोन असे सुमारे २०० मे.टन क्षमतेचे प्रकल्प सन २०१० मध्ये सुरू करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या वतीने तब्बल १५ कोटी रुपये खर्च करून हे प्रकल्प उभारण्यात आले. दोन्ही प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला ३ कोटी १२ लाख रुपयांचा खर्च केला जातो. सध्या हे प्रकल्प सुरू असले, तरी क्षमतेपेक्षा अधिक सुमारे ३०० मे.टन कचरा येथे टाकला जात असल्याने कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याचे समोर आले आहे.याशिवाय महापालिकेच्या वतीने स्वच्छ संस्था, अदर पूनावाला क्लिन सिटी मुव्हमेंट, मे. अर्न्स अॅन्ड यंग आदी विविध संस्थांच्या मदतीने कचऱ्याचे विलगीकरण व अन्य काम करण्यात येत आहे. शहरातील मोठ्या सोसायट्यांना आपला कचरा जिरविण्यासाठी प्रोत्सहान देण्यात येत आहे. परंतु, याकडेदेखील अनेक सोसायट्यांनी पाठ फिरवली आहे. प्रशासनाच्या वतीने नगरसेविक व लोकप्रतिनिधी यांंना आपल्या मतदार संघात कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचा आव्हान करण्यात आले. परंतु, बहुतेक सर्वच नगरसेवकांचा आपल्या प्रभागात कचरा प्रकल्प उभारण्यास विरोध आहे. सध्या तरी कचरा प्रश्नापासून सर्वच दूर पळत असल्याचे चित्र शहरात आहे.(प्रतिनिधी)
कचरा प्रकल्प ठरताहेत पांढरा हत्ती
By admin | Published: April 25, 2017 4:26 AM