पुणे : घराघरांत कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डिटर्जंट्समधील घातक फॉस्फेटची कमाल मर्यादा निश्चित करण्याच्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या मागणीला मान्यता दिली असून, केंद्रीय प्रदूषण मंडळाने त्याबाबतचे पत्र याबाबतचा पाठपुरावा करणारे कार्यकर्ते गणेश बोरा यांना दिले आहे. त्यात म्हटले आहे, की फॉस्फेटचे प्रमाण ५० टक्केकमी करण्यात येईल, त्यामुळे डिटर्जंटमधून नदीत जाणारे सांडपाण्यातील ५० टक्के घातक रसायन कमी होईल. परिणामी प्रदूषणही कमी होणार आहे. डिटर्जंट्समधील फॉस्फेटचे प्रमाण कमी करावे, यासाठी वाल्हेकरवाडीतील पर्यावरण अभ्यासकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा केला होता. अखेर दीड-दोन वर्षांनंतर त्यांना यश आले आहे. मंडळाने आता हे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलल्याचे पत्र पाठविले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मागील ८२५ दिवसांपासून पवना नदी स्वच्छता करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या गणेश बोरा, प्रदीप वाल्हेकर आणि सोमनाथ हरपुडे यांनी त्यांच्या टीमबरोबर जलप्रदूषणाच्या कारणांचा अभ्यास केला. ते करीत असताना त्यांच्या निदर्शनास आढळले, की दररोजच्या जीवनात वापरात येणाऱ्या साबण, डिटर्जंट्समध्ये असणाऱ्या घातक फॉस्फेटमुळे पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. डिटर्जंट्समध्ये उच्च फॉस्फरस/फॉस्फेट वापरणे हे यामागचे मूळ कारण आहे. खरे तर भारतामध्ये ग्राहक व्यवहार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस) १९६८ मध्ये केलेल्या मापदंडामध्ये डिटर्जंटमधील फॉस्फेटच्या कमाल वापराबाबत कोणताही मापदंड अस्तित्वात नाही. गेल्या २ वर्षांपासून रोटेरियन गणेश बोरा यांनी त्यांच्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या माध्यमातून जलशक्ती मंत्रालय, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय आणि भारतीय मानक ब्युरोकडे (बीआयएस) संपर्क साधला. बीआयएस मानदंडांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही संपर्क साधला. त्यानंतर गणेश बोरा यांना केंद्रीय प्रदूषण मंडळाने अंमलबजावणीचे पत्र पाठविले आहे. ........वेगवेगळ्या पाठपुराव्यानंतर बीआयएसने या प्रलंबित दुरुस्तीसाठी मंजुरी दिली. आता नवीन मानकांनुसार डिटर्जंटमध्ये फॉस्फेटची पातळी २.५ ते ५ टक्के कमाल असावी, असे ठरवण्यात आले आहे. घरगुती, लॉँड्री आणि इंडस्ट्रीजमध्ये वापरण्यात येणाऱ्या डिटर्जंटमधील फॉस्फेटची पातळी कमी करण्यात येणार आहे, असे पत्र मिळाल्याचे गणेश बोरा यांनी ‘लोकमत’ला सांगितले
नद्यांमधील घातक ‘पांढरा फेस’ कमी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 1:50 PM
डिटर्जंटमधून नदीत जाणारे सांडपाण्यातील ५० टक्के घातक रसायन होईल कमी
ठळक मुद्देप्रदूषण मंडळाचा निर्णय : पर्यावरण अभ्यासकांनी मंडळाकडे केला होता पाठपुरावा