गावात रासाईदेवी जय संघर्ष पॅनल व रासाईदेवी ग्रामविकास पॅनेल या दोन पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. एक जागा बिनविरोध करण्यात आली उर्वरित अकरा जागांसाठी निवडणूक झाली. शिरूर-हवेलीच्या राजकारणात वडगाव रासाई यांची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. सचिन शेलार यापूर्वी ग्रामपंचायतमध्ये विद्यमान सदस्य होते. या सदस्य पदाचा त्यांनी खिलाडू रीतीने वापर करून त्यांची पत्नी अनुराधा यांना ग्रामपंचायत सदस्य करण्याचा व शिरूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच पती-पत्नी ग्रामपंचायत सदस्यपदी विराजमान होण्याचा मान मिळाला आहे.
कै .मस्कू दादा शेलार हे सदस्य सचिन शेलार यांचे आजोबा, तर दुसरे सदस्य जयराम खळदकर हेपण नातू आहेत, नात अलका चव्हाण व नातसून अनुराधा शेलार, पणतू रत्नकांत खळदकर म्हणजे कै मस्कू दादा शेलार यांच्याच परिवारातील पाच सदस्य हे ग्रामपंचायत सदस्यपदी विराजमान झाल्यामुळे एकाच घरातील रक्तानात्यातील सदस्य विराजमान होण्याचा मान हा वडगाव रासाई ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळाला आहे.
माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे स्वीय सहायक महेश बेंद्रे यांना आंबळे ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या वेळेस बाबूराव पाचरणे हे विद्यमान आमदार होते. तीच परिस्थिती आत्ता विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांचे स्वीय सहायक राजू गिरमकर यांच्याबाबत निर्माण झाली. त्यांना उरलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या स्वीय सहायकांना ग्रामपंचायत निवडणूक धार्जिणी नसल्याचे बोलले जात आहे.
---