पुणे: तुम्ही कोण, मी कोण, तुमची जात कोणती ही दरी समाजात आजही आहे. तुम्ही भावगीत गाता, लोकसंगीत गाता की शास्त्रीय संगीत गाता यावरून विशिष्ट दृष्टीने तुमच्याकडे पाहिले जाते. हे प्रकार मी भोगले आहेत. अण्णा भाऊ साठे यांना मानणारे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाहीत आणि बाबासाहेबांना मानणारे अण्णांना मानत नाहीत. हा काय प्रकार आहे ? असा सवाल प्रसिद्ध शाहीर नंदेश उमप यांनी उपस्थित केला.
या महान व्यक्तिमत्त्वांना आपण बंदिस्त केले आहे. ज्यांनी महाराष्ट्र घडवला अशा शाहिरांना, साहित्यिकांना आणि १०५ हुतात्म्यांना आपण विसरलो आहोत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना विसरलो आहोत. अशाने महाराष्ट्र 'महाराष्ट्र' राहणार नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत डफलीवर थाप मारून समस्त मराठी बांधवांना बुलंद आवाजात ललकारी देणारी ' माझी मैना गावाकडं राहिली' ही छक्कड सादर करून नंदेश उमप यांनी अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना दिली. उद्या ( 1 ऑगस्ट) अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता होत आहे. त्यानिमित्त संवाद पुणे आणि समर्थ युवा फाैऊडेशन यांच्या वतीने नंदेश उमप यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्या हस्ते ' अण्णाभाऊ साठे पुरस्कार' देऊन सन्मनित करण्यात आले.त्यानंतर प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी नंदेश उमप यांचा लोककलेतील प्रवास गप्पांमधून उलगडला. पुरस्कार प्रदान समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील कांबळे, उपमहापाैर सरस्वती शेडगे, सचिन ईटकर, तसेच राजेश पांडे , सुनील महाजन आणि निकिता मोघे उपस्थित होते. पुण्यगरीत अण्णांच्या नावाने पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे.पुणेरी पगडीचा मोठा मान आणि आशीर्वाद मिळाला आहे. या पुरस्काराने जबाबदारी अधिक वाढली आहे. महामानव आणि शाहिरांनी चळवळीची दोरी हातात दिली आहे ती पुढे घेऊन जाण्याचा नक्की प्रयत्न करेन अशी भावना नंदेश उमप यांनी व्यक्त केली. अण्णाभाऊ साठे यांचे अजरामर 'महाराष्ट्र गीत' सादर करून उमप यांनी अण्णाभाऊंना मानवंदना दिली. खरंतर अण्णाभाऊ समाजायला वेळ लागणार आहे. मी त्यांना साहित्यरत्न म्हणणण्यापूर्वी स्वातंत्रसैनिक मानतो ' ये आझादी झुठी है देश की जनता भूखी' है असे ते सडेतोडपणे म्हणायचे. 'माझी मैना' किंवा बंगाली पोवाडा मध्ये अण्णांचे वेगळे दर्शन घडते. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा अभ्यास करायला हवा. अण्णा वाचायला सोपा आहे पण झिरपायला अवघड आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. अण्णाभाऊ साठे आणि शाहीर विठ्ठल उमप यांच्यातील ऋणानुबंध देखील त्यांनी आठवणींमधून उलगडले. नितीन करमळकर म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अडीअडचणींचा सामना करीत आयुष्याला दिशा दिली. ते फारशे शिकलेले नसूनही, त्यांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. सामान्यांचं जगणं लेखनातून मांडले. त्यामुळे केवळ त्यांच्या साहित्याचे वाचन न होता ते लेखन जगता आलं पाहिजे. ......चौकटचार महिन्यांनी सभागृहात रसिकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या चार महिन्यांपासून सांस्कृतिक विश्व ठप्प झाले होते..मैफिली सुन्या सुन्या झाल्या होत्या. शहराच्या दैनंदिन जगण्यातील ताजेपणा हरवला होता. मात्र शुक्रवारी पहिल्यांदाच रसिकांनी सभागृहात जाऊन लाईव्ह कार्यक्रमाची अनुभूती घेतली. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत, सभागृहात प्रवेश करणाऱ्या लोकांच्या शरीराचे तापमान चेक करीत संयोजकांनी कार्यक्रमाचे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले. इतर रसिकांसाठी हा कार्यक्रम फेसबुक पेजवर लाईव्ह सादर झाला......