पुणे : कुरकुंभ येथील अर्थकेम लॅबोरेटरी प्रा.लि. कंपनीचा मालक भीमाजी साबळे आणि युवराज भुजबळ हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. त्यांनी महाराष्ट्रासह देशात इतर किती ठिकाणी व किती व्यक्तींना ‘एमडी’ हा अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा फॉर्म्युला कुणाला आणि कुठे विकला, याचा तपास करण्यासाठी आराेपींची पाेलिस काेठडी वाढवण्याची विनंती तपास अधिकारी शब्बीर सय्यद यांनी न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांनी साबळे आणि भुजबळ यांना दि. ४ मार्चपर्यंत, तर पश्चिम बंगालहून नव्याने अटक केलेल्या सुनील बर्मन या आरोपीला दि. ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करून आतापर्यंत दिल्ली, सांगली आणि पुणे येथे छापा टाकून ३६०० कोटी रुपयांचे १८३७ किलोग्रॅम ‘एमडी’ जप्त केले आहेत. या ड्रग्स प्रकरणात आरोपी सुनील बर्मन यासह एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुनील बर्मन याला बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. यातील भीमाजी परशुराम साबळे आणि युवराज बब्रुवान भुजबळ यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांच्यासह आरोपी बर्मन यालाही गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्यातील अटक आरोपी सुनील बर्मन याचा दिल्ली येथील आरोपी संदीप कुमार, दिवेश मुथानी, संदीप यादव, देवेंद्र यादव व पुणे येथील आरोपी हैदर शेख व पप्पू कुरेशी यांच्याशी संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या मदतीने पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घ्यायचा आहे.
अटक आरोपींना यांच्याकडे समोरासमोर तपास करून व्यवसायाकरिता कुणी अर्थसाह्य केले. आरोपींनी अमली पदार्थांतून मिळालेले पैसे कोणत्या कारणासाठी वापरले, त्याबाबात त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन तपास करायचा आहे. त्यासाठी भुजबळ व साबळे यांची पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकील पल्लवी काशीद यांनी केली; मात्र आरोपींचे वकील ॲड. पुष्कर दुर्गे यांनी भुजबळ आणि साबळे यांच्या पोलिस कोठडीला विरोध केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने दोघांच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली.