पुणे : त्यांची ड्युटी प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवसापासून सुरू होते. रात्री अकरा वाजता घरी गेल्यानंतर पुन्हा सकाळी पाच वाजता मतदान केंद्रावर हजर राहावे लागते. दिवसभर तहान-भूक हरपून काम करायचे; ना जेवणाची सोय ना निवासाची. स्वत:च डबा करून आणायचा, खायला वेळ मिळाला तर ठीक नाहीतर काम करता करताच कोरडा खाऊ हातावर घेऊन खायचा ही अवस्था आहे मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या शिक्षिकांची. निवडणूकीच्या कामाला जुंपला जाणारा हक्काचा घटक म्हणजे हा शिक्षकवर्ग. लोकशाहीच्या मुलभूत प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या या वर्गाला किमान सोयी-सुविधा पुरविण्याची अपेक्षा असताना याकडे शासनाकडून दुर्लक्षच करण्यात आले आहे. आम्ही सहकाऱ्याची अपेक्षा कुणाकडून करणार? आम्हाला वाली कोण? असा उदविग्न सवाल महिला शिक्षकांनी उपस्थित केला आहे. निवडणुकीची रणधुमाळी संपून मंगळवारी (दि. २१) शहरात मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून शिक्षकांच्या कामाला सुरूवात झाली आहे. मतदानाचे सर्व साहित्य हस्तगत केल्यानंतर ते ज्या मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे, तिथे जाऊन ठेवायचे. ते केंद्र मतदानासाठी सज्ज करायचे. एका केंद्रात किती मतदान होईल त्याचा चार्ट फळ्यावर उतरवायचा. मतदानाच्या अशा विविध कामांमध्ये महिला शिक्षकांचा सोमवारचा दिवस मार्गी लागला. यावेळी एका मतदान केंद्रप्रमुखानेच शिक्षकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा पाढा वाचला. जेवण खाण तर सोडाच पण मतदान केंद्रात साध्या फँनची देखील सोय नाही. त्यामुळेच आम्हीच स्वखर्चाने पुढाकार घेऊन थर्मासमध्ये चहा उपलब्ध करून देणे, फँन्स लावणे या गोष्टी शिक्षकांना पुरविल्या आहेत. एखाद्या शाळेत किंवा महाविद्यालयातील मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांनी तरी मुलभूत सोयीसुविधा देण्यासंबंधी विचार करायला काय हरकत आहे? लोकशाही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी शिक्षकांचे योगदान मोठे असते, मात्र तेच दुर्लक्षित राहात आहेत, याकडे लक्ष वेधले. सकाळीच निघताना बरोबर डबा आणल्यामुळे किमान सोमवारचा त्यांचा दिवस तरी सत्कारणी लागला. मात्र मतदानाच्या दिवशी तरी किमान शासन किंवा लोकप्रतिनिधींकडून शिक्षकांच्या मुलभूत सोयी-सुविधांचा विचार केला जावा अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आली. जेवण-चहा याबरोबरच महिलांना रात्रीच्या वेळेस जाण्याची बससुविधा मिळायला हव्यात, मात्र या मागण्या महिलांच्या वतीने पुरूषमंडळींकडूनच मांडले जात होते. आपल्या अडचणी सांगितल्या तर नोकरीवर गडांतर येईल की काय अशी भिती महिलांना वाटत होती.
निवडणुकीच्या धामधुमीत आम्हाला वाली कोण?
By admin | Published: February 21, 2017 2:11 AM