पुणे : ‘अरे आव्वाज कुणाचा’चा जयघोष... दोन संघांच्या विद्यार्थ्यांनी आमनेसामने एकमेकांसमोर ठोकलेल्या आरोळ्या... टाळ्यांचा कडकडाट अशा जल्लोषात फिरोदिया करंडक स्पर्धेचे बुधवारी पारितोषिक वितरण झाले. सामाजिक, आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी निर्मित फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. सीईओपीच्या संघाला उद्योगपती अरुण फिरोदिया यांच्या हस्ते करंडक प्रदान करण्यात आला. याशिवाय दुसरे पारितोषिक मिळालेल्या व्हीआयटी संघासह विद्यार्थ्यांना वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.फिरोदियासारख्या स्पर्धांमधून नावारूपाला आलेल्या ॠषीकेश दातार, सौरभ भालेराव आणि जसराज जोशी यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जयश्री फिरोदिया, वर्षा परांजपे, मिलिंद मराठे आणि ‘फिरोदिया’चे संयोजक सूर्यकांत कुलकर्णी उपस्थित होते. फिरोदिया म्हणाले, की युवा कलाकारांची सर्जनशीलता अवाक् करणारी आहे. कलेचा विस्मय वाटावा असा संगम त्यांच्या कलाकृतीतून दिसून येतो. त्यामुळेच या वर्षी पहिला आणि दुसरा क्रमांक पटकाविणाऱ्या दोन्ही इंजिनिअरिंग महाविद्यालयांच्या एकांकिकेत ‘कला’ प्रकाराची योग्य दखल घेतली गेली आहे. सीओईपी आणि व्हीआयटी या महाविद्यालयांच्या अनुक्रमे ‘गुलिस्ता’ आणि ‘जयप्रभा’ या एकांकिकांचे सादरीकरण झाले. (प्रतिनिधी)
अरे आव्वाज कुणाचा?
By admin | Published: March 03, 2016 1:40 AM