लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वर्चस्ववादातून जनता वसाहतीचा भाई कोण ? यावरुन दोन टोळक्यांमध्ये कोयता इतर शस्त्रांने तुंबळ हाणामारी झाली.
त्यानंतर दोन्ही गटांनी परिसरात शस्त्र फिरवत वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली. ही घटना जनता वसाहतमधील विठ्ठल मंदिराजवळील गल्ली क्रमांक २५ आणि २६ येथे रविवारी सायंकाळी साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
समीर सोपनराव शिवरकर (वय ३९, रा. गल्ली क्रमांक ३८, रा. जनता वसाहत) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नवनाथ वाडकर, वैभव मोरे, वैभव राऊत, वैभव शिंदे, संग्रमा पाटोळे, शुभम देशमाने, सोमनाथ वाडकर,ऋषिकेश कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवरकर हे त्यांचा मित्र संकेत लोंढे याच्यासोबत बोलत थांबले होते. त्या ठिकाणी आरोपी आले. त्यावेळी नवनाथ वाडकर हा म्हणाला की, माझ्या भागात येऊन भाईगिरी करतो काय, इथला भाई फक्त मीच आहे. या दोघांची विकेट टाकून वर पाठवितो, असे म्हणत समीर व संकेतला फरफटत शेजारच्या गल्लीत घेऊन गेला. त्या ठिकाणी दोघांच्या डोक्यात, पायावर, हातावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, साथीदारांनी लाकडी दांडक्यानी त्यांना मारहाण केली. त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांना आम्हीच जनता वसाहतीचे भाई आहोत, असे म्हणत दहशत निर्माण केली.
या घटनेनंतर तासाभरानंतर संकेत लोंढे व त्याचे साथीदार गल्ली क्रमांक २६ मध्ये गेले. त्यांच्या हातात कोयता, लोखंडी रॉड हाता घेऊन फिरवत त्या ठिकाणी दहशत निर्माण केली. त्या ठिकाणी फिर्यादी उमेश प्रभाकर स्वामी (वय ४८) यांच्या टेम्पोची व इतर गाड्यांची तोडफोड केली. तसेच, स्वामी यांच्या पत्नीवर कोयत्याचा वार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तो वार चुकविला. याप्रकरणी स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लोंढे याच्यासह अक्षय नवले, रोहन जाडे, अदित्य चव्हाण, गणेश जाधव, रोशन उर्फ बाबू उल्हाळकर, हरी शेळकंदे यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--