पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकात सुमारे १ हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाकडून मिळकतकरात सरसकट १८ टक्के, तर पाणीपट्टीत ९०० रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. स्थायी समितीने ही दरवाढ फेटाळली असली, तरी या दरवाढीबाबत निर्णय घेण्यासाठी गुरुवारी खास सभा होणार आहे.महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आग्रही असून, काँग्रेस आणि शिवसेनेचा विरोध आहे. मनसेकडून सर्वसामान्यांवर कराचा बोजा न टाकता व्यावसायिक कर वाढ करण्यासाठी मागणी होत आहे. त्यामुळे करवाढीचा बोजा कोणावर पडणार, याकडे लक्ष लागले आहे. मागील वर्षी स्थायी समितीने तब्बल ४१५० कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. मात्र, डिसेंबरअखेरपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत अवघे २५५० कोटी रुपये जमा झाले आहेत. तर मार्चअखेरपर्यंत त्यात आणखी ५०० कोटींची भर पडण्याची प्रशासनासआशा आहे. मात्र, त्यानंतरही हजार कोटींची तूट येणार असल्याने त्याचा परिणाम पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकावर होणार आहे. त्यातच पुढील आर्थिक वर्षात एलबीटी रद्द होण्याची भीतीही असल्याने प्रशासनाकडून या दोन्ही करवाढी प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यात मिळकत करातील वाढीमुळे १९२ कोटी रुपये, तर पाणीपट्टीत ७५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्रशासनास अपेक्षित होते. मात्र, हा निर्णय घेण्यासाठी झालेल्या स्थायीच्या खास सभेत राष्ट्रवादी वगळता इतर सर्वपक्षीय सदस्यांनी विरोध केला. त्यामुळे राष्ट्रवादीनेही आपली भूमिका मागे घेत करवाढीस विरोध केला होता. आता हा प्रस्ताव मुख्य सभेत आला आहे.(प्रतिनिधी)
करवाढीचा बोजा कोणावर?
By admin | Published: February 12, 2015 2:33 AM