बिबवेवाडी : येथील बिबवेवाडी व कोंढवा परिसराला जोडणारा सीताराम ठाकरे रस्त्यावर गणात्रा कॉम्प्लेक्सकडे वळताना कॉर्नरला विद्युत रोहित्रे असून, या रोहित्राला घातलेले सुरक्षा कुंपण अनेक ठिकाणी तुटलेल्या परिस्थतीत आहे. त्यातच नागरिक या ठिकाणी कचरा टाकत असल्यामुळे सर्व कचरा विद्युत रोहित्राच्या सुरक्षा कुंपणाच्या आतमध्ये पसरल्यामुळे इथे आग लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. विद्युत रोहित्रांना अचानक कधीही आग लागते किंवा त्यातील तेलाची गळती सुरू होत असते. त्यातच नागरिक येथे ओला व सुका कचरा टाकत असल्यामुळे येथे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
या परिसरातील नागरिक झाडांच्या फांद्याचा कचरा येथे आणून टाकत असल्यामुळे भटकी जनावरे या कचऱ्यावर चरण्यासाठी येत असतात. तसेच घरातील ओला कचरा टाकत असल्यामुळे भटकी कुत्री व डुक्करे अन्नाच्या शोधात अशा धोकादायक विद्युत रोहित्राच्या तुटलेल्या सुरक्षा कुंपणाच्या आत वावरत असतात. कचरा गोळा करणाºया महिला व पुरूषदेखील या ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी फिरत असतात. अशा परिस्थितीत जर एखादा प्राणी किंवा माणूस या विद्युत रोहित्राच्या जवळ गेला तर मोठा अनर्थ घडू शकतो. नागरिक येथे कचरा टाकत असल्यामुळे महापालिकेचे कचरा गोळा करणारे कर्मचारी जिवाच्या भीतीने त्या विद्युत रोहित्राच्या जवळ जाण्यास घाबरत असतात. त्यामुळे तेथील साफसफाई करता येत नसल्यामुळे येथे कायमस्वरूपी कचरा असल्याचे दिसून येते. या विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन अनेक वेळा आग लागलेली आहे. अशा विद्युत रोहित्रांच्या सुरक्षा कुंपणाची विद्युत विभागाकडून त्वरित डागडुजी करून येथील कचरा त्वरित हलविण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.वारंवार घडतात अपघात१ बिबवेवाडी परिसरात अशी विद्युत रोहित्रे अनेक ठिकाणी आहेत परंतु अशा विद्युत रोहित्रांना सोसायटीकडून किंवा विकासकांकडून वीट बांधकामाचे किंवा तारांचे सुरक्षा कुंपण टाकण्यात आले आहे. तरी देखील अशा ठिकाणी अनेक वेळा अशा कुंपणाच्या दारांना कुलूप न लावल्यामुळे लहान मुले खेळताना आत जाऊन अनेकदा मोठे अपघात होऊन मृत्युमुखी पडले आहेत.२ बिबवेवाडी परिसरातील अशा धोकादायक परिस्थितीत असलेल्या विद्युत रोहित्रांबद्दल आभिप्राय घेण्यासाठी पद्मावती विभागाचे उपअभियंता राजेंद्र ऐडके यांच्याशी अनेक वेळा फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.