इंदापूरातील काँग्रेस भवन नक्की कोणाचे? हर्षवर्धन पाटील व संजय जगताप आमने सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 04:16 PM2022-01-27T16:16:30+5:302022-01-27T16:16:43+5:30
इंदापूर शहराच्या मध्यवस्तीत असलेले काँग्रेस भवन गेल्या कित्येक दिवसापासुन कुलुप बंद असून वादाच्या भोवर्यात सापडले आहे
बाभुळगाव : इंदापूर शहराच्या मध्यवस्तीत असलेले काँग्रेस भवन गेल्या कित्येक दिवसापासुन कुलुप बंद असून वादाच्या भोवर्यात सापडले आहे. इमारतीच्या ताबे वहिवाटीच्या वादातून भाजप नेते हर्षवर्धन पाटील व पुरंदरचे आमदार संजय जगताप हे पहिल्यांदाच इंदापूरात आमने सामने आल्याने कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. परंतु इंदापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी मध्यस्थी करत आपसातील वाद मिटवुन दोन्ही पार्ट्यांना १४९ ची नोटीस बजावल्याने वातावरण शात झाल्याचे चित्र समोर आले.
सन २०१५ मध्ये तात्कालीन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यांनी काँग्रेस चॅरिटेबल ट्रस्ट नावाची संस्था स्थापन करून सदरचे भवन व जागा ही ट्रस्टच्या नावे केली. व त्या जागेचा फेरफार काँग्रेस चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने नोंद केला. सदरची बाब ही २०१९ मध्ये जिल्हा काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोर्टात केस दाखल करून जिल्हा भुमी अभिलेख अधिक्षक यांचेकडेही तक्रार दाखल केली. त्यावर निकाल देताना नविन नोंद केलेला फेरफार चुकीचा असल्याचा निर्वाळा जिल्हा भुमी अभालेख अभधीक्षक यांनी दिला. व सदरचा फेरफार हा पुन्हा अध्यक्ष इंदापूर काँग्रेस कमेटी या नावाने करण्याचे आदेश दिले.
आमदार संजय जगताप यांनी कार्यकर्त्यांसह २६ जानेवारी रोजी काँग्रेस भवन खुले व्हावे. या हेतूने येऊन काँग्रेस भवनचे कुलुप तोडले व ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगुन संजय जगताप यांना पोलीस स्टेशनमध्ये येऊन चर्चा करण्याची विनंती केली. त्यानुसार संजय जगताप पोलीस स्टेशनला आले. व नंतर हर्षवर्धन पाटीलही आले. दोंघानी समोरा समोर चर्चा करून सदर प्रकरणी तोडगा काढला. व तुर्तास प्रकरण मिटल्याचे सांगीतले. परंतु काँग्रेस भवनचा ताबा सध्या काँग्रेसकडे असल्याचे संजय जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, काँग्रेस भवन संदर्भातील वाद हा न्यायप्रविष्ट आहे. व भुमी अभिलेख उपसंचालक यांचेकडे वाद सुरू आहे. असे असताना संजय जगताप यांनी त्यांचे कार्यकर्त्यांसह येवुन काँग्रेस भवनचे कुलुप तोडणे व ताबा घेणे ही गोष्ट चुकीची आहे. तालुक्यातील जनतेच्या सार्वजनिक कामासाठी कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या नावे ती जागा घेतली होती. या जागेशी अखिल भारतीय काँग्रेस (आय ) कमिटीचा संबंध येत नाही. या जागेचा मालमत्ता कर, पाणी पट्टी, विज बिल आदी वर्षानुवर्षे आम्ही भरत आहोत, हे सगळ्यांना माहिती आहे. आज ही जागा ट्रस्टच्या ताब्यात असुन भवनचा ताबा हर्षवर्धन पाटील यांचेकडेच असल्याचा दावा केला.