बारामती : कोरोना संसर्ग झाल्याने गंभीर अवस्थेतील रुग्णांवर देवगुणी ठरलेल्या ‘रेमडीसिवीर’ या इंजेक्शनचा बारामती शहरात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळविण्यासाठी मेडिकल व्यावसायिकांच्या दारोदारी भटकण्याची वेळ आली आहे. हा तुटवडा संपविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे. कोरोनाचा आलेख वाढल्यानंतर बारामतीत रुग्णांवर शासकीय पातळीवर प्रभावी उपचार करण्यासाठी प्रशासन यशस्वी ठरत आहे.
शहरात आजपर्यंत ६0 जणांचा कोरोना बळी गेलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर यंत्रणा बसविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. अधिक अधिक रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यासाठी प्रशासन नियोजन करत आहेत. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल, रुग्णाचे आधारकार्ड तसेच इंजेक्शन आणणाऱ्या व्यक्तीचे आधारकार्ड घेतले जात आहे. त्यानंतरच हे इंजेक्शन देण्यात येते. प्रतिरुग्ण १ ते २ इंजेक्शन सध्या उपलब्ध होत आहे. शुक्रवारी (दि.१८) दुपारपासूनच या इंजेक्शनचा शहरात तुटवडा निर्माण झाला. केवळ बारामतीच नव्हे तर आसपासच्या फलटणसह इतर तालुक्यातून हे इंजेक्शन मिळविण्यासाठी बारामतीमध्ये रुग्ण येत आहेत.
शनिवारी (दि.१९) दुपारी १२ च्या दरम्यान बारामती शहरात हे इंजेक्शन उपलब्ध झाले. ते मिळविण्यासाठी कोविड उपचार केंद्राच्या ठिकाणी झुंबड उडाली होती. अत्यवस्थ रुग्णासाठी उपचार केंद्राकडून नातेवाईकांना तातडीने हे इंजेक्शन आणण्यास सांगितले जाते. मात्र यावेळी कोणत्या ठिकाणी इंजेक्शन उपलब्ध आहे याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती मिळत नाही. एकीकडे कोरोना संसर्गमुळे अत्यवस्थ झालेला रुग्ण आणि दुसरीकडे या इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे नातेवाईक हतबल होतात. इंजेक्शनच्या काळजीने या नातेवाईकांचा ‘बीपी’ वाढतो. इंजेक्शन न मिळाल्यास आपल्या रुग्णाचे काय होणार या चिंतेपोटी नातेवाईक संबंधितांचे उंबरठे झिजवतात. यापार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेने यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.
बारामती शहरातील कोरोना रुग्णसंख्या २५८७ वर गेली आहे. गेल्या २४ तासात शहरात ९५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. १ सप्टेंबरपासून शहरात सरासरी प्रतिदिन १०० रुग्ण आढळले आहेत. २ आठवड्यांचा जनता कर्फ्यु प्रशासनाने जाहीर केला. यामध्ये एमआयडीसीतील उद्योग व्यवसायांना सुट देण्यात आली. मात्र उदासीन नागरिकांमुळे जनता कर्फ्यु अयशस्वी ठरला.