युगंधर ताजणे- पुणे : दिवसभर घरात बसून असतो. कंटाळा आल्याने दोन शब्द शेजारच्या व्यक्तीशी बोलण्यास गेलो असता ते लोक आम्हाला कोरोना झाला आहे अशा पद्धतीने वागणूक देतात. घरातील लहान मुलांना जवळ घेतले, त्यांची लाडाने, मायेने विचारपूस केली ती देखील घरातल्या माणसांना खपत नाही. पाय मोकळे करून यावं म्हटलं तरी सगळीकडे जाण्यास मनाई केल्याने कुठे जाता येत नाही. अशावेळी अडकून पडल्यासारखे झाले आहे. आम्हाला कुणी विचारणार आहे की नाही ? असा प्रश्न ज्येष्ठ मंडळी विचारू लागली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नोकरदार व्यक्ती, महिला, लहान मुले, यांच्याकरिता प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र त्यात ज्येष्ठ व्यक्तींना डावलण्यात आले असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. शहरात सध्या 38 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. 45 टक्के पेन्शनधारक आहेत. तसेच शहरातल्या ज्येष्ठ नागरिक संघाची संख्या 210 इतकी असून कोथरुड भागात 54 ते 60 ज्येष्ठ नागरिक आहेत. सध्या कोरोनामुळे सर्वजण घरात बसून आहेत. सर्वांना काळजी व स्वयंशिस्त बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र यात ज्येष्ठ नागरिक कुठे आहे? हा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे कोथरूड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष श्रीराम बेडकिहाळ यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, पहाटे, सायंकाळी फिरण्यासाठी ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडतात. आता ते काही दिवसांपासून बंद झाले आहे. गप्पा मारण्यासाठी एकमेकांकडे जाणे बंद झाले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे औषधे घेणे अवघड झाले आहे. साधारण आठ ते दहा दिवस पुरेल एवढा त्यांचा साठा करता येतो. पुढे काय? ती औषधे मागविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अद्याप कित्येक ज्येष्ठ नागरिकांकडे मोबाईल फोन नाही. मुले कामानिमित्त परदेशी असल्याने ते घरात एकटे आहेत. यावेळी काय करणार? कोण मदतीला धावून येते. तसेच काहीजण पेन्शनधारक आहेत. त्यांना किमान पैसे मिळतात. मात्र अनेक व्यक्तींना पैशासाठी झगडावे लागते. हे कुणाच्या गावी नाही. सामाजिक सेवाभावी संघटना मदत करतात. परंतु त्याला मयार्दा आहेत. एखादा गंभीर प्रसंग ओढवला गेल्यास काय करणार याची चिंता त्यांना भेडसावते. शासनाने त्यांच्या खात्यावर किमान पैसे जमा करावेत. आणि वयाची अट न ठेवता त्यांना विमा संरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे. कुणाकडे बोलायला जायची भीती आहे. फिरण्याची भीती आहे. सगळ्याच सोसाट्यामध्ये फिरण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना नाईलाजाने घरात बसावे लागते. याशिवाय बँकेत जाता येईना, आपण कुणाला सांगितले चालढकल केली जाते. लवकर कुणी ऐकत नाही. अनेकदा बँकेत गेल्यावर कळते पुरेसे पैसे खात्यावर नाहीत. मुलांनी तातडीने पैसे पाठविणे गरजेचे असल्याने ते न मिळाल्याने चिडचीड होत असल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिक करत आहेत.
* कोरोनामुळे शहरात जो बंद आपण पाळत आहोत त्यासाठी पोलीस याबरोबरच अनेक संघटना चांगले सहकार्य करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपला हेका सोडून बदलत्या काळानुसार जगायला हवे. सध्याची तरुनपिढी आणि आपण यात समन्वय कसा साधला जाईल याचा विचार करावा. वयाच्या मानाने ज्येष्ठ नागरिकांकडून चुका होतात हे मान्य आहे. मात्र त्यांनी आपल्या स्वभावाला मुरड घालण्याची आवश्यकता आहे. पिढी दर पिढी प्रत्येकाचे अनुभव बदलत जातात. तेव्हा आपण सामंजस्य दाखवावे. - अरविंद कान्हेरे ( संस्थापक / अध्यक्ष - जागृती ज्येष्ठ नागरिक संघ, इंद्रप्रस्थ ज्येष्ठ नागरिक संघ, पुणे)