पुणे : शरद पवार यांना समाजमाध्यमांद्वारे धमकी देणाऱ्याचे नाव सौरव पिंपळकर असल्याचे निदर्शनास आले आहे. हे नाव कोणाचे आहे? त्याच्या मागे कोण आहे? त्यावर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असा केलेला उल्लेख खरा आहे का? या सर्व प्रश्नांचा शोध घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन करणार आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.
सुप्रिया यांनी यासंदर्भात तक्रार केली असल्याचे समजले. मी मुख्यमंत्र्यांना फोन केला, मात्र ते उपलब्ध नसल्याचे समजले. उपमुख्यमंत्र्यांनाही फोन केला होता. ते मुंबईत आहेत. त्यांची भेट घेऊन याची पाळेमुळे खणून काढण्यास सांगणार आहे. त्यांचा फोन घेऊन त्याचा कोणाकोणाशी संपर्क आला, त्याला कोणी काही सांगितले का? या सर्व गोष्टींचा तपास व्हायला हवा, असेही पवार म्हणाले.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, अलीकडे माध्यमेही चुकीच्या बातम्या देत असतात. जे बोललेच नाही ते बोलले म्हणून खपवतात. त्यावर दुसरे कोणी लगेच प्रतिक्रिया वगैरे व्यक्त करतात. नंतर दिलगिरी वगैरे व्यक्त केली जाते, मात्र यातून एखाद्या नेत्याची, पक्षाची विनाकारण बदनामी होत, असे प्रकार बंद व्हायला हवेत.
नेत्यांकडूनही राजकारणात होऊ नयेत अशी वक्तव्ये केली जात आहेत, याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, सर्वच पक्षाच्या नेत्यांनी याबाबत काळजी घ्यायला हवी. महाराष्ट्राचा इतिहास सुसंस्कृतपणाचा आहे. सरकारने पाहिजे तर यासंदर्भात कायदा करावा. अधिवेशन आता नाही, जुलैमध्ये आहे. तोपर्यंत पाहिजे तर सरकारने अध्यादेश काढावा, नंतर त्याला कायद्यात रूपांतरित करता येईल. मात्र कोणीतरी काहीतरी बोलते, त्यावर अन्य कोणी काही तशाच भाषेत उत्तर देते. हे महाराष्ट्राला साजेसे नाही. वरिष्ठ नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालायला हवा. असे प्रकार त्वरित बंद झाले पाहिजेत.