पुणे लोकसभेत 'WHO IS' काँग्रेसचा उमेदवार? आव्हान तगडा उमेदवार देण्याचे व लढण्याचेही
By राजू इनामदार | Published: March 14, 2024 04:47 PM2024-03-14T16:47:05+5:302024-03-14T16:47:43+5:30
कसबा पोटनिवडणुकीनंतर भाजप सावधपणे पावले टाकत असून आता काँग्रेससमोरचे आव्हान अधिकाधिक अवघड होत चालले आहे
पुणे: भाजपने पुणे शहर लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे. काँग्रेससमोर आता आधी उमेदवार जाहीर करण्याचे व त्यानंतर लढत देण्याचे आव्हान आहे. महाविकास आघाडीतील त्यांचे मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व अन्य मित्रपक्षांनाही काँग्रेस करणार तरी काय याची चिंता आहे.
कसब्यातील जादू
पक्षीय गटबाजी, संघटनेचा अभाव, नेत्यांमधील विसंवाद अशा अनेक गोष्टी असतानाही कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला. भाजपने त्यावेळी थेट केंद्रीय मंत्ऱ्यांपासूनचे बळ कामाला लावले होते, मात्र काँग्रेसचाच विजय झाला. त्याच बळावर आता काँग्रेसने शहर लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी शड्डू ठोकले आहेत. मात्र कसबा विधानसभेत चालली ती एकीची जादू इथेही चालणार का हा खरा प्रश्न आहे.
काँग्रेसच्या अडचणीत वाढ
भाजपकडून अतिआत्मविश्वासातून कसबा पोटनिवडणुकीत चुकाही बऱ्याच झाल्या. त्यातही ’हू इज धंगेकर?‘ हा काँग्रेसच्या उमेदवाराचा अवमान करणारा प्रश्न त्यांना अधिक त्रासदायक झाला. त्यामुळेच की काय आता भाजप सावधपणे पावले टाकत आहे व त्यातून काँग्रेससमोरचे आव्हान अधिकाधिक अवघड होत चालले आहे. मोहोळ यांची उमेदवारी बरीच आधी जाहीर करून भाजपने काँग्रेससमोरील अडचणीत आणखी वाढ करून ठेवली आहे. त्यामुळे काँग्रेसला बराच बारीक विचार करून उमेदवार जाहीर करावा लागेल असे दिसते आहे.
धंगेकर यांचे नाव आघाडीवर
कसबा पोटनिवडणुकीतीलच विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्याबरोबर प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष अऱ्विंद शिंदे, माजी उपमहापौर आबा बागूल, यांच्यासह तब्बल २० उमेदवारांनी काँग्रेसची उमेदवारी करण्याची इच्छा दर्शवली आहे. त्याशिवाय मागील वर्षी होते ते संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांचे नाव यंदाही चर्चेत आहेच. मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर यातील कितीजण कायम राहतील याची चर्चा लगेचच सुरू झाली आहे. त्यातही धंगेकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनीही पक्षाने आदेश दिला तर असे म्हणत लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी जाहीरपणे दर्शावली आहे.
मित्र पक्षही शंकित
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने काँग्रेसकडे ही जागा मागितली होती, मात्र काँग्रेसने स्पष्ट नकार दिल्याने ही चर्चा पुढे सरकलीच नाही. फार नाही तर साधारण २० वर्षांपूर्वा काँग्रेसचे या मतदारसंघावर एकहाती वर्चस्व होते. मात्र आता त्यांच्या मतपेढीचा पायाच खचला असल्याचे मागील ३ ते ४ लोकसभा निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे पक्षाची मतदारसंघातील सगळीच वीणच विस्कटली आहे. निवडणूकीत पराभव झाल्यानंतर ती पुन्हा घट्ट करण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही. पुढची निवडणूक आल्यावरच नेते व कार्यकर्तेही जागे होतात. यंदाही तसेच झाले आहे. त्यामुळेच तगडा, सक्षम उमेदवार जाहीर करण्याचे आव्हान तरी काँग्रेसला पेलवेल का अशी शंका त्यांच्याच मित्र पक्षांमधून व्यक्त होते आहे.