पुणे - कसबा, चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कसब्यात भाजपाचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांची थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
कसब्यात पोटनिवडणुकीच्या पोस्टल मतदानात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर पहिल्या फेरीच्या मतमोजणीत धंगेकर यांनी ३ हजारांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या फेरीनंतर ही धंगेकर यांची मतांची आघाडी कमी झाली. तर तिसऱ्या फेरीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी ६०० मतांची आघाडी घेतली होती. परंतु त्यानंतर पुन्हा मतमोजणीनंतर धंगेकर आघाडीवर गेले. रवींद्र धंगेकर यांना ११,७६१ तर हेमंत रासने यांना १०,६७३ यांना मते मिळाली आहेत.
तर चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप यांनी पोस्टल मतदानापासून आतापर्यंतच्या सर्व फेरीत आघाडी घेतली आहे. भाजपाच्या अश्विनी जगताप ११,२२२ मते, तर नाना काटे ९,४३५, राहुल कलाटे ३९४२ मते मिळाली आहेत. अश्विनी जगताप चिंचवड मतदारसंघात आघाडीवर आहेत.