पुणे: शिवाजीनगर एसटी स्थानक पाडून ४ वर्षे झाली. त्यानंतर आता त्या जागेवर मेट्रोचे भुयारी स्थानक तयार होऊनही वर्ष होत आले. आता कुठे स्थानकाचा आराखडा तयार होतो आहे, बांधकामाला अजून किती वर्षे लागतील, ते सांगता येत नाही. या विलंबाला व त्यातून वाढलेल्या खर्चाला जबाबदार कोण? असा प्रश्न आम आदमी पार्टीच्या पुणे शहर शाखेने विचारला आहे. दरम्यान, आम्ही दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याला यश मिळाले असून, आता बांधकाम सुरू करण्याबाबत ‘महामेट्रो’ने घाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, की शिवाजीनगर एसटी स्थानक वाकडेवाडीला नेले, त्याच वेळी एसटी महामंडळ व महामेट्रो यांच्यात कधी बांधायचे, कोणी बांधायचे याबाबतचे करार होणे गरजेचे होते. मात्र, पुणे शहरातील कोणीही लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष दिले नाही. प्रशासनाने त्यांच्या सोयीप्रमाणे निर्णय घेऊन स्थानक पाडूनही टाकले. या बेजबाबदारपणाचा त्रास पुणेकर प्रवासी मागील ४ वर्षे सहन करीत आहेत. शिवाय, इतका विलंब केल्याने खर्च वाढला ते वेगळाच. त्यामुळे नागरिकांनीच आता या वाढलेल्या खर्चाची जबाबदारी पुण्याच्या लोकप्रतिनिधींवर टाकावी.
काँग्रेसच्या शहर शाखेने मागील महिन्यातच शिवाजीनगर एसटी स्थानकाचे बांधकाम रखडल्यावरून आंदोलनाचा इशारा दिला होता. परिवहन खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यांना वेळ होत नसल्यानेच एसटीचे महत्त्वाचे निर्णय रखडले आहेत, असा आरोप करून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी शिंदे याची गाडी अडविण्याचा इशारा दिला होता. आमच्या या आंदोलनाला यश आले असून, त्यातूनच शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या कामासंबंधीचा निर्णय झाला आहे, असा दावा जोशी यांनी केला. आता ‘महामेट्रो’ने त्यांनीच पाडलेल्या एसटी स्थानकाचे काम लवकर करावे, अशी मागणी त्यांनी केली.