लोकसभा निवडणुकीत बारामतीचा उमेदवार कोण? शरद पवारांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 04:33 PM2023-12-02T16:33:09+5:302023-12-02T16:54:34+5:30
पुण्यातील पत्रकार परिषदेत पवार बोलत होते....
पुणे : भाजपसोबत जाण्यासाठी मते मागितली नव्हती. ज्यांना जायचे होते ते त्यांच्यासोबत गेले. मला स्वतःचा निर्णय घेण्याची कुवत होती. मी माझ्या पक्षाचा अध्यक्ष होतो, माझी आजही भाजपविरोधात तीच भूमिका आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी केले. काल कर्जतमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. पुण्यातील पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
पवार म्हणाले, राजीनामा देण्याचा सामुहिक निर्णय झाला होता. पण त्यावेळी त्यांनी त्यांचा (अजित पवार गट) राजकीय निर्णय घेतला तो त्यांचा प्रश्न आहे. पण अजित पवार जे बोलले ते खोटे आहे. अजित पवारांच्या टीकेचा त्रास होत नाही. प्रफुल्ल पटेल त्यांच्या पुस्तकात काय लिहतात त्याची मी वाट पाहतोय. पटेलांना पराभवानंतरही तिकीट दिले होते. जे पक्ष सोडून गेलेत त्यातील अनेकजण सभागृहात दिसत नाहीत. तर दुसरीकडे भुजबळांना व्यक्तिगत पातळीवर विरोध होत असेल, अशी शक्यताही पवारांनी व्यक्त केली.
बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?
कर्जतच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी राज्यातील सातारा, बारामती, राजगड आणि शिरूर लोकसभेच्या जागा लढविणार आहे, अशी घोषणा केली होती. याबद्दल पवारांना विचारले असता पवार म्हणाले, संसदीय लोकशाहीत कोणी कुठूनही लढू शकतो. कोणी काहीही स्टेटमेंट करेल ते मी का स्विकारावे? आमचा बारामतीचा उमेदवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठरवतील. जयंत पाटील जो उमेदवार ठरवतील तो व्यक्ती बारामतीमधून खासदारकीची निवडणूक लढविणार, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्याती बैठकीत राज्यातील दुष्काळावर चर्चा झाली. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी पवारांनी केली.