लोकसभेच्या पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले...
By राजू इनामदार | Published: January 23, 2024 02:46 PM2024-01-23T14:46:00+5:302024-01-23T14:46:55+5:30
यावेळी बोलताना पटोलेंनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबद्दलही सांगितले...
पुणे : आमचे सरकार होते त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस, ‘आरक्षण देणे हा राज्य सरकारचा अधिकार आहे’ असे म्हणत होते. मग आता त्यांचेच सरकार आहे तर ते निर्णय का घेत नाहीत? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मराठा ओबीसी यांच्यातील वाद हे आताच्या सरकारचे पाप आहे अशी टीका त्यांनी केली. यावेळी बोलताना पटोलेंनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबद्दलही सांगितले. पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी आम्ही पक्षाच्या शहर शाखेकडून रितसर नावाची यादी मागवली आहे. त्यातून ज्यांच्याकडे निवडून येण्याची गुणवत्ता असेल त्यांचे नाव निश्चित होईल असे पटोले यांनी सांगितले.
पक्षाच्या लोकसभा निवडणूकपूर्व विभागीय बैठकीसाठी म्हणून पुण्यात आलेल्या पटोले यांनी काँग्रेसभवनमध्ये पत्रकारांबरोबर संवाद साधला. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच अन्य राज्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पटोले म्हणाले, राज्यातील सरकारकडे आता पाशवी बहूमत आहे, ते निवडणूकीतून मिळवलेले नाही, कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही. इडीच्या धमक्या देऊन तयार झालेले हे सरकार आहे. राज्य सरकारकडे निर्णय आहे तर मग आरक्षणाचा निर्णय का घेत नाही ते जनतेला सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाचीही तुलना होऊच शकत नाही. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, रयतेचे राजेच राहणार. त्यामुळे कोणी त्यांच्याबरोबर तुलना करत असेल तर ते अयोग्य आहे.
मराठा मोर्चा घेऊन मुंबईकडे निघालेले जरांगे पाटील मुंबईत पोहचले तर काय होईल याचा विचार सरकार करणार आहे की नाही? त्यांच्या बाबतीत सरकार गोलमटोल भूमिका घेत आहे. राज्यातील जनतेला हे सरकार कसे झाले? कशामुळे झाले? ते काय करत आहेत? हे सगळे कळत नसेल असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. जनतेला सगळे कळते. त्यामुळे त्यांनी भ्रमात राहू नये असे पटोले म्हणाले.