नम्रता फडणीस
पुणे : अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग हा चिंतेचा विषय बनला असून, मुलांमधील हिंसा शाळेपर्यंत पोहोचली आहे. मुलांना सोशल मीडिया, इंटरनेट आणि वेबसिरीजच्या माध्यमातून गुन्हा करण्याचे मार्ग कळायला लागले असून, आसपासचे सामाजिक आणि कौटुंबिक वातावरण, गुन्हा केला तरी शिक्षा होत नाही, असा अल्पवयीन मुलांमधील गैरसमज या गोष्टी मुलांमधील हिंसकतेला कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी मांजरी येथील एका खासगी शाळेत वार्षिक संमेलनाच्या आयोजनातून वाद झाल्याचा राग मनात धरून नववीच्या विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गमित्राने काचेच्या तुकड्याने गळा चिरल्याची घटना घडली. यामुळे मुलांमधील वाढत्या हिंसकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुले घरात असतात तोवर लक्ष ठेवणे शक्य आहे; पण समाजात वावरताना त्यांच्याशी कुणी चुकीचे वागले तर ते कसा प्रतिसाद देतील? त्याचे परिणाम काय होतील, याची आम्हालाही कल्पना नसते, असे पालकांचे म्हणणे आहे.
समाजात बेरोजगार मुले इकडे-तिकडे भटकताना दिसतात. अल्पवयीन मुलांसमोर आदर्श घेण्यासारखे कुणी नसेल तर अशा मोठ्या वयाच्या मुलांचा आदर्श घेतला जातो, मुले त्यांचे अनुकरण करायला लागतात. अजूनही एक लक्षात न घेतलेली गोष्ट म्हणजे बाजारपेठेचा मुलांना पॅकिंग फूड देण्याकडे कल वाढतोय. एखादी गोष्ट कुरकुरीत ठेवण्यासाठी ज्या कोणत्या रसायनाचा वापर केला जातो. त्याचा मुलांच्या मेंदूवरही नकळत परिणाम होतोय. - डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक
शाळेत एखाद्या मुलाचे बुलिंग होत असेल तर शांत असलेला मुलगा कधीतरी टोकाचे पाऊल उचलू शकतो. कित्येकदा किशोर वयात मुलांना भावना योग्य पद्धतीने हाताळता येत नाहीत. स्क्रीनच्या व्यसनामुळे मुलांमधील संयम देखील कमी होत चालला आहे आणि त्यांच्यात परिणामांची चिंता न करता कृती करण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी मुलांकडून शाळेचे नियम पाळले गेले पाहिजेत. किशोर वयात पालकांनी मुलांचे मित्र व्हायला हवे. - डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ
कुटुंबात एकच संतती असल्यामुळे पालक मुलांना कोणत्याही गोष्टींसाठी नकार देत नाहीत. त्यामुळे मुलांमध्ये नकार पचविण्याची क्षमता विकसित होत नाही. कुणी काही म्हटले तरी तसेच व्हायला पाहिजे, ही विचारसरणी मुलांच्या मनात दृढ होत चालली आहे. याला आजूबाजूची परिस्थिती पूरक अशीच आहे. - डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ