पुणे : कर्वे रस्ता व्हीआयपी रस्ता झाला तरी कधी? कोणी केला? ते जाहीर केले का? नियमाप्रमाणे त्यावर हरकती, सूचना मागवल्या का ? कर्वे रस्त्यावरील खंडोजीबाबा चौकापासून ते थेट करिष्मा सोसायटीपर्यंतच्या दोन्ही बाजूंच्या तब्बल एक हजारपेक्षा जास्त व्यापारी, व्यावसायिकांनी हा प्रश्न विचारला आहे. सलग चार वर्षांपासून या रस्त्यावरचे दुचाकी वाहनांसाठीचे पार्किंग वाहतूक शाखेने बंद केले असल्याने या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे.
व्यापारी संघटनेने पार्किंग सुरू करा, अशी मागणी केल्यानंतर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता व्हीआयपी रस्ता असल्याचे सांगत पार्किंग पुन्हा सुरू करायला जवळपास नकारच दिला आहे. त्यामुळेच व्यापाऱ्यांनी आता हा रस्ता व्हीआयपी रस्ता केला तरी कधी, असा प्रश्न केला आहे. महापालिका व वाहतूक शाखा, दोघेही पार्किंग सुरू करण्याचे काम परस्परांवर ढकलत असून, त्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही प्रशासन त्याची दखलच घ्यायला तयार नाही. वाहने लावली की लगेचच वाहतूक विभागाची गाडी येऊन कारवाई करते. त्यामध्ये ग्राहकांना दंड होतो. वाहन दुसरीकडे घेऊन गेले की तिथे जाऊन दंड भरून ते सोडवून आणावे लागते. यामुळे बहुसंख्य व्यापारी त्रस्त झाले आहेत.
बँका, महाविद्यालये, शाळा, रुग्णालये अशा सार्वजनिक वापराच्या इमारती या रस्त्यावर आहेत. त्याशिवाय सराफ, कपडे, औषधे व अन्य अनेक प्रकारची दुकानेही आहेत. त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना त्यांची दुचाकी किंवा चारचाकी वाहने लावण्यासाठी रस्त्यावर सध्या जागाच नाही. पर्यायी रस्ते आहेत तिथेही रस्त्याच्याकडेला पार्किंग स्थानिक लोक लावू देत नाहीत. रस्त्यावर लावण्यासाठी मनाईच आहे. ही मनाई करताना चार वर्षांपूर्वी मेट्रोचे काम सुरू असल्याचे कारण देण्यात आले होते. ते काम आता संपले आहे. त्यानंतर दुहेरी उड्डाणपुलाचे कारण देण्यात आले. तेही काम पूर्ण झाले आहे. त्यामुळेच मध्यंतरी कर्वे रस्ता व्यापारी संंघटनेच्या वतीने पूर्वीप्रमाणे सम-विषम तारखांना पार्किंग सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली होती.
सामान्य माणसे व्हीआयपी नाहीत का?
रस्ता व्हीआयपींसाठी आहे, तर त्यावरून सामान्य माणसे व्हीआयपी नाहीत का? सलग चार वर्षांपासून मेट्रोचे काम, स्मार्ट सिटीचे काम, दुहेरी उड्डाणपुलाचे काम अशी कारणे देत या रस्त्यावरचे सम-विषम पार्किंग बंद केले आहे. आमचे व्यवसाय ५० टक्क्यांनी घटले आहेत. आता सगळी कामे झाली तर पार्किंग पुन्हा सुरू करा अशी मागणी आम्ही केली, तर त्यात आता रस्ता व्हीआयपी आहे असे सांगण्यात येत आहे. हे अयोग्य आहे. सम-विषम तारखांना वाहनतळ सुरू करा, अशी आमची मागणी आहे.
ओमप्रकाश रांका- अध्यक्ष, कर्वे रस्ता व्यापारी संघटना
अजून कोणताही निर्णय नाही
आम्ही कोणीही हा रस्ता व्हीआयपी रस्ता म्हणून जाहीर केलेला नाही. मोठ्या पदांवरच्या महत्त्वाच्या व्यक्ती आल्या तर तेवढ्याकाळापुरता हा रस्ता व्हीआयपी म्हणून वापरण्यात येतो. त्या काळात वाहनधारकांचेही आम्हाला सहकार्य मिळते. व्यापारी संघटनेने सम-विषम तारखांना पार्किंग करावे, अशी मागणी केली आहे. सर्व यंत्रणा, म्हणजे व्यापारी संघटना, मेट्रो, पीएमपीएल, वाहतूक यांची संयुक्त बैठक घेऊन यावर चर्चा करावी लागले. वरिष्ठांकडे हा विषय नेला आहे. अजून तरी त्यावर आम्ही निर्णय घेतलेला नाही. मात्र, कार्यवाही सुरू आहे.
- विजय मगर- वाहतूक उपायुक्त