पुणे : भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवित सत्ता स्थापनेच्या दिशेने झेप घेतल्यानंतर शहराच्या प्रथम नागरिकाचा मान असणाऱ्या महापौर पदाची माळ यंदा कोणाच्या गळयात पडणार याची उत्सुकता लागलेली आहे. यंदा पुण्याचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपाच्याकडून निवडून आलेल्या माजी गटनेत्या मुक्ता टिळक, रेश्मा भोसले, वर्षा तापकीर, माधुरी सहस्त्रबुध्दे, मानसी देशपांडे, मंजुश्री नागपुरे, निलिमा खाडे या प्रमुख दावेदारंसह कोण महापौर बनणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.महापालिकेच्या सभागृहामध्ये ८२ महिला उमेदवारांनी विजयश्री संपादन करून प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता महापौरपद महिलेकडेच असणार असल्याने पालिकेमध्ये महिलाराज असणार आहे. पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचा महापौर होणार आहे. पुण्यनगरीच्या प्रथम नागरिक होण्याचा मान १९९६ पासून आतापर्यंत ८ जणींना मिळाला आहे, आता नवव्यांदा भाजपाच्या महिला महापौर सभागृहाची सुत्रे हाती घेणार आहेत. भाजपाकडील विजयी उमेदवारांची संख्या पाहता, महापौर पदासाठी महिलेची निवड करणे मोठ जिकिरीचे काम असणार आहे. भाजपाच्या सिनिअर महिला सभासद या पदासाठी चर्चेत आहेत, त्याचबरोबर उमेदवारी अर्ज भरण्याच्या अर्ध्या तासापूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या रेश्मा भोसले यांनीही या पदावर दावेदारी सांगितली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट व खासदार संजय काकडे यांची महिला महापौर निवडीमध्ये महत्त्वाची भुमिका राहिल. महापालिकेतील सर्वोच्च पद असलेले स्थान महिलेला मिळण्यासाठी १९९६ चे साल उजाडावे लागले. कमल व्यवहारे यांच्या रूपाने महापालिकेला पहिल्या महिला महापौर लाभल्या. त्यानंतर वंदना चव्हाण, वत्सला आंदेकर, दिप्ती चवधरी, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, चंचला कोद्रे या महिला महापौर पुण्याला लाभल्या. महिला महापौरांनी त्यांच्या कारकिर्दीत बंद पाइपलाइन, बीआरटी, मेट्रो, आयटी पार्क, महिला सक्षमीकरण असे अनेक महत्त्वांचे निर्णय घेऊन त्यांनी महापौर पदाची कारकिर्द गाजविली. त्याचबरोबर पालिकेच्या सभागृहाचे कामकाज अत्यंत चांगल्यापध्दतीने हाताळून अवघड आव्हान सहजपणे पेलले.असा राहिला महिला सभादांचा प्रवास : पुणे नगरपालिकेची स्थापना १० मे १८५७ रोजी झाली, मात्र १९३८ पर्यंत नगरपालिकेची सभासद म्हणून एकाही महिलेची नियुक्ती झाली नाही किंवा ती निवडून येऊ शकली नव्हती. त्यानंतर १९३८ ते १९५० या काळात दोन महिला सभासद होत्या. नगरपालिकेची महापालिका झाल्यानंतर १९५२ मध्ये ६५ पैकी एका जागेवर महिला सभासद निवडून येऊ शकल्या.
महापौरपदाची माळ कुणाच्या गळयात?
By admin | Published: February 24, 2017 3:48 AM