पिंपरी : महापालिकेत राष्ट्रवादीला चीतपट करून भाजपाने स्पष्ट बहुमताची मुसंडी मारली आहे. या यशाचा आनंदोत्सव साजरा केल्यानंतर आता भाजपाचा पहिला महापौर कोण होणार याची उत्सुकता आहे. महापौरपदी वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी स्थानिक नेत्यांमार्फत प्रदेश पातळीवर लॉबिंग सुरू केले आहे. त्यामध्ये आमदार लक्ष्मण जगताप समर्थक शत्रुघ्न काटे, आशा शेंडगे, जयश्री गावडे, आमदार महेश लांडगे समर्थक नितीन काळजे, संतोष लोंढे, राहुल जाधव, तर मूळ भाजपाचे नामदेव ढाके, योगिता नागरगोजे व केशव घोळवे यांची नावे चर्चेत आहेत. उद्योगनगरीचे महापौरपद ओबीसीसाठी राखीव आहे. पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागांतील ओबीसी प्रवर्गातून अनेकजण निवडून आले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी आपल्या स्थानिक नेत्यांकडे संधी देण्याची विनवणी सुरू केली आहे. मूळ भाजपाचे असलेले काही नवनिर्वाचित नगरसेवक ही महापौरपदासाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये भाजपात नव्याने दाखल झालेल्या इच्छुकांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे मूळ भाजपामध्ये असलेल्या नगरसेवकास संधी मिळणार, की नव्याने दाखल झालेल्यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडेल याविषयी उत्सुकता आहे. भाजपाचा पहिला महापौर होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मात्र, संधी कोणाला द्यायची याबाबतची चाचपणी होणार आहे. दरम्यान, या विजयात शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे, लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिकेतील पदवाटपात शहरातील नेत्यांच्या समर्थकांना कितपत संधी देतात याकडे लक्ष लागले आहे. आपल्याला संधी मिळावी यासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांचे प्रयत्न सुरू असतानाच शहरातील नेत्यांनी देखील आपल्या समर्थकांसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. (प्रतिनिधी)
उद्योगनगरीच्या महापौरपदी कोणाची वर्णी?
By admin | Published: February 25, 2017 2:33 AM