पुणे: केंद्र व राज्याच्याही पक्ष प्रमुखांमध्ये बदल झाल्याने तो शहरातही होणार या खात्रीने भारतीय जनता पार्टीतील अनेकांनी शहराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिल्लीसह राज्यात व स्थानिक स्वराज्य संस्थेतही सत्ता असल्यामुळे सत्ताधारी संघटनेच्या पदाचे आकर्षण यामागे आहे. नगरसेवकांसह काही आमदारांनीही या पदासाठी इच्छा व्यक्त केल्याचे समजते. त्यासाठी पक्षात केलेल्या संघटनात्मक कामाचे दाखले देण्यात येत आहेत.राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांची निवड झाल्याने ते त्यांची नवी टीम तयार करण्याची शक्यता आहे. संघटनेत प्रदीर्घ काळ काम केल्यामुळे पाटील यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिली आहे. त्यामुळेच ते त्यांची अशी खास टीम मोक्याच्या पदावर आणणार आहेत अशी चर्चा आहे. राज्यस्तरावर व त्याचबरोबर राज्यातील काही मोजक्या शहरांमध्ये शहराध्यक्षपद बदलण्याचा त्यांचा विचार असल्याचे पक्षातील काही सुत्रांनी सांगितले. पुण्यात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या थरात चांगला संपर्क असल्यामुळेच पाटील बदलणार असलेल्या शहराध्यक्षपदाच्या यादीत पुणे शहराचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.स्वीकृत नगरसेवक गणेश बीडकर पालिकेत सत्ता आल्यापासून सत्तेच्या वर्तुळाबाहेर आहेत. पालिका निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी स्वीकृत नगरसेवकपद वरिष्ठ स्तरावर भांडून मिळवले, पण त्यानंतर त्यांनी कधीही पालिकेतील सत्ता वर्तुळात भाग घेतला नाही. त्याआधीच्या सभागृहात ते सलग ५ वर्षे भाजपाचे गटनेते म्हणून काम पहात होते. आता गेली अडीच वर्षे ते पालिकेतील सत्तेपासून बाजूला राहून पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमवेत संघटनेचे काम करत असल्याचे दिसते आहे. त्यातही बारामती लोकसभा मतदारसंघात ते निवडणुकीच्या वेळी चंद्रकांत पाटील यांचे विश्वासू म्हणून काम पाहत होते. पालिकेतील सत्ता नाही तर आता शहराध्यक्षपद मिळावे म्हणून ते इच्छुक असल्याची माहिती मिळाली.स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचेही नाव अध्यक्षपदाच्या स्पर्धेत घेतले जात आहे. पालिकेतील सत्तेत पहिल्याच वर्षी त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले, मात्र त्यानंतर ते सत्ता वतुर्ळाबाहेरच आहेत. कार्यकर्त्यांचा मोठा संच त्यांच्यामागे असून गेली काही वर्षे ते शहर संघटनेत सक्रिय आहेत. त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरही त्यांचा चांगला संपर्क असल्याचे बोलले जाते.पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनाही शहराध्यक्षपदात रस असल्याचे बोलले जात आहे. आमदारकीची त्यांची ही दुसरी टर्म आहे. त्यांच्याकडेही नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे. सत्ताधारी पक्ष असल्यामुळे त्यांनी शहराध्यक्षपद घ्यावे, किमान तशी मागणी करावी, असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. हे पद मिळाले तर भाजपाची पुण्यातील पहिली महिला शहराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळेल व त्याचा पक्षालाही प्रतिमा चांगली होण्यास मदत होईल, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा युक्तीवाद आहे. विद्यमान शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची पदाची मुदत पूर्ण होत आहे. भाजपात काही असाधारण राजकीय प्रसंग किंवा अडचण असेल तरच फक्त पदाला मुदतवाढ देण्यात येते. महापालिका व लोकसभा निवडणूक गोगावले यांच्या अध्यक्षतेखालीच लढवली. महापालिकेत भाजपाला प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले तर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने गिरीश बापट यांचा विजय झाला. संघटना बळकट करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पक्षाकडे केल्याची माहिती मिळाली.
........
सत्ताधारी पक्षाच्या पदाच्या वलयाचे आकर्षणभाजपात शहराध्यक्षपदासाठी अशी स्पर्धा सुरू असताना त्यांचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र त्यांचे दोन्ही शहराध्यक्ष पदावरून कमी केले आहेत. शिवाय त्यानंतर त्या पदांवर नव्या नियुक्त्याही जाहीर केलेल्या नाहीत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला एक अध्यक्ष नियुक्त करून त्यांनी त्यांच्यावरच सगळी मदार दिली आहे.