लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील ‘हाऊस ऑफ पराठा’च्या शेजारी ‘हाऊस फुल पराठा’ नावाने सुरू असलेल्या हॉटेलने नाव व व्यापारचिन्ह स्वामित्वाचा (नोंदणीकृत ट्रेड मार्कचा) भंग केल्याचे स्पष्ट करीत ‘हाऊस फुल पराठा’ या नावाने व्यवसाय करण्यास जिल्हा न्यायालयाने मनाई आदेश दिला आहे. ‘हाऊस ऑफ पराठा’ या हॉटेलच्या व्यवस्थापनाने दाखल केलेल्या दाव्यात जिल्हा न्यायाधीश व्ही. के. यावलकर यांनी हा निकाल दिला.
२०१७ ला ‘हाऊस फुल पराठा’ या नावाने ट्रेडमार्क नोंदणीसाठी अर्ज केला होता. मात्र, ‘हाऊस ऑफ पराठा’ या नावाने आधीच ट्रेडमार्क नोंदणीकृत असल्यामुळे व त्यांनी हरकत घेतली असल्याने ‘हाऊस फुल पराठा’ यांचा ट्रेडमार्क नोंदणीचा अर्ज जानेवारी २०२० रोजी फेटाळला. त्यानंतरही ‘हाऊस फुल पराठा’ या नावाने पराठा विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवल्याने ‘हाऊस ऑफ पराठा’च्या व्यवस्थापनाने ॲड. ओजस देवळणकर यांच्या वतीने न्यायालयात मनाईचा दावा दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून ‘हाऊस फुल पराठा’च्या व्यवस्थापनाने ट्रेडमार्कचा भंग केल्याचे मान्य करून ‘हाऊस ऑफ पराठा’ या नामसदृश किंवा इतर प्रकारे साम्य असेल अशा प्रकारे खाद्यपदार्थांची विक्री न करण्याचा आदेश दिला.