''दादां''नी राजकीय संन्यास घेतल्यास शरद पवारांचा राजकीय वारस कोण..? राजकीय चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 12:54 PM2019-09-28T12:54:38+5:302019-09-28T14:00:09+5:30
खासदार सुप्रिया सुळे , रोहित पवार, पार्थ पवार..की अजून कुणी..?
बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.मात्र, यावर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारराजकारण सोडुन शेती करण्याच्या विचारात आहेत,त्यांनी मुलांनाही शेती करण्याचा सल्ला दिला आहे,अशी माहिती दिली.मात्र, पुत्र पार्थ पवार यांना खासदार करण्यासाठी जीवाचे रान करणारे अजित पवार हा सल्ला कसा देवु शकतात,याबाबत राजकीय पटलावर विविध चर्चांना उधाण आले आहे.तसेच दादांनी खरोखर राजकीय संन्यास घेतल्यास साहेबांचा राजकीय वारस कोण ,हा प्रश्न नव्याने चर्चेत आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून लागलेल्या मेगा गळतीनंतर साहेबांच्या झंझावाती महाराष्ट्र दौऱ्यानंतर पक्ष आता कुठे सावरायला सुरुवात झाली होती.. त्यात कालच्या ईडीच्या नाट्यमय प्रकरणात शरद पवारांनी घेतलेला पवित्रा राष्ट्रवादीसाठी 'मास्टरस्ट्रोक' ठरावा इतपत यशस्वी झाला.. पण त्याचा आनंद साजरा करत असतानाच राजकीय आणि राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप घडविणारी बातमी आली.. अन् काही क्षणार्धात सर्वत्र राजकीय क्षेत्रात विविध चर्चाना उधाण आले.साहेबांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पण अजित पवारांच्या राजीनामा अस्रावर अजित पवारांनी आपल्याशी कुठलाही संपर्क केला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच राजकारणाची खालावत चाललेली पातळीकडे कारण देत दादा राजकीय संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले.. यानंतर चर्चा सुरु झाली ती दादांनंतर साहेबांचा राजकीय वारस कोण.. ? खासदार सुप्रिया सुळे , रोहित पवार, पार्थ पवार की धनंजय मुंडे वा अजून कुणी...?
मावळ लोकसभेचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचे नाव निश्चित झाल्यानंतर पार्थला विजय मिळवा, या साठी माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी निवडणुकीत संपुर्ण राजकीय ताकत पणाला लावली. मावळ मतदारसंघातील त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यापासुन मतदानापर्यंत अजित पवार यांनी विशेष लक्ष दिले. राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीलाच पुत्र पार्थ यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी,यासाठी अजित पवार यांनीच मोठी ताकत लावली होती. गेल्या दहा वर्षांपासून 'मावळ'वर शिवसेनेचे वर्चस्व ठेवण्यात शिवसेनेचे श्रीरंग बारणे यशस्वी ठरले आहेत. हे माहिती असुन देखील पार्थ यांच्या विजयासाठी प्रबळ उमेदवार असणाऱ्या खासदार बारणे यांना दादांनी जोरदार फाईट देण्याचा प्रयत्न केला. याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीत माघार घेत असल्याचे जाहीर करत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पार्थ यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीसह पवार कुटुंबाचे प्रमुख असणाऱ्या ' साहेबां 'चा देखील पाठिंबा होता.या मतदारसंघातून मुलगा पार्थ याला निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी स्वत: कंबर कसली होती.मात्र,त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यानंतर पार्थ यांच्याबाबत राजकीय चर्चा थांबल्या.परंतु, पार्थ पवार यांनी नुकताच १६ सप्टेंबर रोजी बारामती शहरात बेरोजगारांसाठी मोठा मेळावा घेतला होता.यावेळी मेळाव्याला पार्थ यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार,भाऊ जय पवार देखील उपस्थित होते. या मेळाव्यामुळे पार्थ पुन्हा राजकीय रिंगणात उतरणार असल्याचे मानले जात होते.मात्र,पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ' साहेबां'च्या माहितीनुसार अजितदादांनी गलिच्छ राजकारणामुळे त्यांच्या मुलांना शेती करण्याचा सल्ला दिला आहे.याबाबत अजितदादांच्या कुटुंबाकडुन माहिती मिळाल्याचे देखील यावेळी साहेबांनी स्पष्ट केले.त्यामुळे पुत्र पार्थ यांना खासदार करण्याचा चंग बांधलेल्या दादांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलाला शेती करण्याचा सल्ला का दिला,यामागे मोठे राजकीय की कौटुंबिक गुढ आहे,याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. त्यासाठी खुद्द अजित पवार यांच्याकडूनच राजीनाम्याचे कारण जाणून घ्यावे लागणार आहे.