बारामती : बारामती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान दिले जाते. यंदा मात्र, हा प्रश्न चिघळला आहे. सानुग्रह अनुदान न मिळाल्याने अधिकारी,कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि. १२ ) नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. ऐन दिवाळीत आंदोलन सुरु झाल्याने शहरातील स्वच्छतेसह विविध कामांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.
दरवर्षी सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांना देण्यासाठी तत्परता दाखविली जाते. मात्र, मंगळवारी(दि १०) अचानक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पदाधिकारी यांनी सानुग्रह अनुदानाबाबत विचार करून मार्ग काढु, असे आश्वासन दिले. आजपर्यंत याबाबत निर्णय न झाल्याने गुरुवारी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला.तसेच कामगार संघटनेचा विजय असो, कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणाबाजी केली.
गुरुवारी ( दि. १२ )बारामती नगर परिषदेसमोर कर्मचारी एकत्रित आले. कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्याकडे सानुग्रह अनुदानाबाबत विचारणा केली.त्यावर यादव यांनी मी देखील तुमच्यातील कर्मचारी आहे. माझ्या हातात काही नाही याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नगराध्यक्षांचा आहे. त्यानंतर यावर अधिकारी व कर्मचारी यांनी पालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी केली.तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.
यावर्षी कोविड-१९ या महामारीच्या काळात पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले. कोविड रुग्ण असलेल्या परिसरात जाऊन निर्जंतुकीकरण करणे, बॅरागेट बांधणे आदी कामांचा त्यामध्ये समावेश आहे. ज्या काळात कोरोना रुग्णाच्या जवळ जाण्यास कोणी धजावत नव्हते, त्यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. पूरपरिस्थितीच्या बिकट काळात काम केले. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, स्ट्रीट लाईट, अग्निशमन, या सर्व ठिकाणी कर्मचारी आघाडीवर होते,असे उपमुख्यमंत्री पवार यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.बारामतीच्या आसपासच्या ब वर्ग नगरपालिकांनी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले आहे. पण बारामती नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे, असे संतप्त कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.————————————————...गेट बंद करुन काम बंद आंदोलन सुरुसर्व कर्मचाऱ्यांनी मिळून आज बारामती नगरपालिकेचे गेट बंद करुन काम बंद आंदोलन सुरु केले आहे. गुरुवारी सानुग्रह अनुदानावर पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला नाही. तर उद्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे कामगार प्रतिनिधी राजेंद्र सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.