कोण आहेत हे तुषार भोसले? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खास शैलीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 08:22 PM2021-06-14T20:22:33+5:302021-06-14T20:30:21+5:30

राज्य सरकारने बसने वारीचा घेतलेला निर्णय तातडीने बदलावा अन्यथा राज्यातून असंख्य वाऱ्या निघतील असा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी दिला होता.

Who is Tushar Bhosle? Deputy Chief Minister Ajit Pawar's taunt | कोण आहेत हे तुषार भोसले? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खास शैलीत टोला

कोण आहेत हे तुषार भोसले? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खास शैलीत टोला

Next

ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पायी पालखी सोहळा झाला पाहिजे याच मताचे आम्ही आहोत. एव्हाना कोरोना संकट नसतं तर आम्ही देखील या पालख्यांचे स्वागतच केले असते. पण सध्या कोरोना संकट असल्यानेच बसने वारीचा निर्णय घ्यावा लागला, हे स्पष्ट करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्यावर देखील आपल्या खास शैलीत निशाणा साधला. 

यंदा पण राज्य सरकारने बसनेच आषाढी वारी सोहळ्याला परवानगी दिली आहे. याबाबतचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. मात्र पायी वारी सोहळ्याला परवानगी द्या, अन्यथा पायी वारी काढणारच असा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी राज्य सरकारला दिला होता.

याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी कोण तुषार भोसले? असा प्रतिसवाल उपस्थित करत टोला लगावला. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीने अशाप्रकारे विधान केले तर कितपत गांभीर्याने घ्यायचे ते  वेगळे आहे. आम्ही वारकरी संप्रदायाशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे. आम्ही देखील पालख्या निघाव्यात याच मताचे आहोत. पण ते सत्तेत नाही म्हणून काहीही बोलत आहे. कुंभमेळा किंवा ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी कोरोना वाढला आहे. कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे वारकऱ्यांना निर्बंधांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

काय म्हणाले होते तुषार भोसले...

आषाढी वारी हे जागतिक वैभव आहे. मात्र,राज्यातील आघाडी सरकारने पायी आषाढी वारीला खोडा घातला आहे. राज्य सरकारचा निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. राज्यातील आघाडी सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे पायी वारी  व्हावी ही वारकरी संप्रदायाची भावना आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने आपला निर्णय बदलावा अन्यथा राज्यातून असंख्य वाऱ्या निघतील असा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी दिला होता.

यंदा असा होणार आषाढी वारी सोहळा... 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आषाढी वारीसाठी परवानगी दिलेल्या पालख्या या बसनेच नेण्यात येणार आहेत. राज्य शासनाने याबाबत आदेश नुकताच जारी केला आहे. या आदेशानुसार गतवर्षीप्रमाणेच वारीचं स्वरुप असणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात वाखरी ते पंढरपूर दरम्यानचे दीड किलोमीटर अंतरच पायीवारी होणार आहे.

यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी, देवस्थान आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारनं यंदाही एसटी बसने पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. शासनानं वारीसाठी काढलेल्या सुधारित नियमावलीनुसार मानाच्या दहा पालख्यांनाच या वारी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी यावर्षी देहू आणि आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळयांसाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.

Web Title: Who is Tushar Bhosle? Deputy Chief Minister Ajit Pawar's taunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.