पुणे : दिवसेंदिवस प्रामाणिक काम करणाऱ्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. आधीच सरकारी कार्यालयात प्रामाणिक काम करणाऱ्यांची संख्या अत्यल्प त्यात त्यांच्यावरही हल्ले होत असल्याने ही चितेंची बाब आहे. या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याची कारणेदेखील वेगवेगळी असल्याने नेमकी चूक कोणाची, याचा न्यायनिवाडा न्यायालयात होतो. पण असेच जर सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले वाढत राहिले, तर तो चिंतेचा विषय ठरेल. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांवर सहा महिन्यांत ३० हल्ले झाले आहेत.
सरकारी व्यक्ती जर चुकीचे काम करत असेल तर त्याच्यावर हल्ला करण्यापेक्षा इतर कायदेशीर मार्गांचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच प्रामाणिक व्यक्तीवर हल्ले होत असतील तर अशा हल्लेखोरांवरदेखील कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.
३० शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले
गेल्या सहा महिन्यात पुण्यातील ३० शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यांमध्ये आहेत. त्यातील २० गुन्हे उघडकीस आले असून उर्वरित १० गुन्ह्यांमध्ये पोलीस तपास करत आहेत.
सर्वाधिक हल्ले पोलिसांवर..
३० सरकारी नोकरांवरील हल्ल्यापैकी १७ हल्ले हे पोलिसांवर झाले आहेत. त्यानंतर एमएसईबी आणि मनपाच्या प्रत्येकी ५ जणांवर, वैद्यकीय विभागातील दोघांवर तर पीएमटीच्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली.
तर पाच वर्षांपर्यंत शिक्षा...
पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केला तर ३५३ कलमांतर्गत जास्तीत जास्त दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती. तसेच तो गुन्हा जामीनपात्र असल्याने अटक केलेल्या इसमाची जामिनावर सुटकादेखील लगेच होत होती. आता मात्र राज्य सरकारने अशा गुन्ह्याच्या शिक्षेचा कालावधी पाच वर्षांपर्यंत वाढवला असून तो अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे.
हल्ले वाढण्याची कारणे काय?
अवैध रेतीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक, नागरिकांमधील प्रशासनाविषयीचा राग, पोलीस आणि नागरिकांमध्ये कारवाईनिमित्त असलेल्या वादावादीचे रूपांतरदेखील अनेकदा मारहाणीत होते. विविध ठिकाणी आंदोलनांदरम्यान पोलीस ज्यावेळी आंदोलनकर्त्यांना उचलायला जातात तेव्हा, मनपा अतिक्रमण विभागाच्या कारवाईदरम्यान यासह विविध कारणास्तव हे हल्ले होतात.