जे भाजपसोबत गेले; त्यांच्यासोबत आमचा कसलाही सहभाग नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:40 PM2023-08-14T12:40:19+5:302023-08-14T12:40:31+5:30

महाविकास आघाडीत आम्ही विचाराने एकत्र, भाजपशी कोणताही संबंध नाही

who went with the BJP We have no involvement with them Sharad Pawar spoke clearly | जे भाजपसोबत गेले; त्यांच्यासोबत आमचा कसलाही सहभाग नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

जे भाजपसोबत गेले; त्यांच्यासोबत आमचा कसलाही सहभाग नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

googlenewsNext

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलेही संभ्रमाचे वातावरण नाही. जे भाजपसोबत गेले आहेत, त्यांच्यासोबत आमचा कसलाही सहभाग नाही. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारुन संभ्रम तयार करु नका, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजप बाबतची भूमिका स्पष्ट केली.

 बारामतीत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये आम्ही विचाराने एकत्र आलो आहोत. भाजपबाबत आमची देश आणि राज्य पातळीवर भूमिका स्पष्ट आहे. भाजपशी सबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध असण्याचे कारण नाही. महाविकास आघाडीची बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट रोजी आहे. तर १ रोजी इंडीयाची हयात हॉटेलमध्ये बैठक आहे. त्याची जबाबदारी माझ्यासह माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. आम्ही ती उत्तमरीत्या आयोजित करु. काँग्रेसमधून या बैठकीसाठी कोण उपस्थित राहणार याबाबत माहिती नाही. प्रकाश आंबेडकर यांच्यासंबंधी मविआ मध्ये काहीही चर्चा झाली नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यात दुबार पेरणीचे संकट ओढवल्याच्या विषयावर पवार म्हणाले, बारामतीसारख्या ठिकाणी टँकर लावण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी लोक चारा छावण्या सुरु करण्याची मागणी करीत आहेत. काही भागात पाऊस नसल्याने ही वेळ आली आहे. तसेच काही ठिकाणी पेरण्या झाल्या. मात्र, पाऊस न झाल्याने ही वेळ आल्याचे पवार म्हणाले. शासनाने या संकटाकडे गांभीर्याने पहावे, असे आवाहन पवार यांनी केले.

नेपाळमधुन टोमॅटो आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर ते म्हणाले, इथे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागल्यावर परदेशातून माल आणण्याची भुमिका केंद्र सरकार घेते. याचा स्वच्छ अर्थ हा आहे कि, शेतकरी उत्पादकाला यातना कशा देता येतील. ही भूमिका सरकार घेत असल्याची टिका पवार यांनी केली.

Web Title: who went with the BJP We have no involvement with them Sharad Pawar spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.