पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीनंतर होऊ घातलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शनिवारी (दि. १५) पहिली बैठक होत आहे. या दोन्ही पदांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाव निश्चित करणार आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर नाव असलेले शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी अध्यक्ष होण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचे सांगत मंत्रिपदासाठीचा क्लेम कायम ठेवला आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रीपदापासून वंचित असलेल्या खेड तालुक्यातील आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना किमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद तरी द्या अशी जोरदार मागणी मोहिते-पाटील समर्थकांनी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे केली आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी प्रामुख्याने आमदार अशोक पवार यांचे नाव पुढे आले होते. मात्र, त्यांनी आपण अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितल्याने आता बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे सोपवणार, याची चर्चा सुरू झाली आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते, जुन्नरचे संचालक संजय काळे, पुरंदर तालुक्यातील संचालक प्रा.दिगंबर दुर्गाडे, विकास दांगट यांच्यासह विद्यमान अध्यक्ष व सर्वात ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांची नावे चर्चेत आली आहेत. अजित पवार यांनी त्यांच्या पॅनलच्या सर्व संचालकांची बैठक शनिवारी सकाळी १० वाजता जिल्हा बँकेत बोलावली आहे. या बैठकीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित केले जाणार असून, त्यानंतर दुपारी एक वाजता ही निवडणूक होणार आहे.