शेतकऱ्यांच्या जीवनाशी दैनंदिन निगडित असलेली हक्काची संस्था म्हणून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जात आहे. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शंकर जांभळकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या पदासाठी शनिवारी निवड प्रक्रिया होत आहे.
सभापती शंकर जांभळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. शेतकरी हितासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले. त्यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यापूर्वी सभापती असलेल्या शशिकांत दसगुडे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संपूर्ण कर्जात बुडालेली संस्था नफ्यात आणली होती. त्याचबरोबर त्यांनी जनावरांचे बंद पडलेले बाजार सुरू केले होते. कांदा बाजार सुरू करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विशेष प्रयत्न केले होते. पूर्णवेळ या ठिकाणी कामकाज पाहिल्याने त्यांनी अल्पावधीत कर्जाच्या खाईत असलेली संस्था पूर्णपणे नफ्यात आणून शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळवून दिले होते. उच्चशिक्षित असलेल्या जांभळकर यांनीही कोरोनाच्या संकटात संस्थेला तारून नेले, तर कर्मचारी वर्गाचीही काळजी घेतली होती. त्यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिला होता.
शनिवारी होत असलेल्या सभापती निवडीसाठी आबाराजे मांढरे यांच्यासह ॲड. वसंत कोरेकर, प्रकाश पवार यांच्या नावाची अधिक चर्चा होत असून, ऐनवेळी कोणाचे नाव जाहीर होणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. बाजर समिती सभापतिपदासाठी नाराजांची मोट बांधताना ‘कार्यक्षम’ उमेदवारास संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.
शिरूर तालुक्यात विकासाच्या मार्गावर असलेल्या या संस्थेच्या सभापतिपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
कसं...तर पक्षश्रेष्ठी म्हणतील तसं
शिरूर तालुक्यात सभापतिपदासाठी अनेकांनी विविध प्रकारे फिल्डिंग लावली असली तरी, ही निवड गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व आमदार अशोक पवार यांच्या सूचनेनुसार केली जाणार आहे.