पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (दि.१७) आणि रविवारी (दि.१८) अशी दोन दिवस रंगणार आहे. अंतिम फेरीत नऊ महाविद्यालयांच्या संघाची निवड करण्यात आली असून, त्यांची चुरस अंतिम फेरीत पाहायला मिळणार आहे.
भरत नाट्य मंदिरात स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार असून, रविवारी (दि.१८) रात्री स्पर्धेचा निकाल जाहीर होईल. प्रत्येकजण नव्या दमाने आणि ऊर्जेने कामाला लागला असून, अंतिम फेरीत आत्मविश्वासाने एकांकिकांचे सादरीकरण करण्यास प्रत्येकजण सज्ज झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 'अरे आव्वाज कुणाचा'च्या जल्लोषात अंतिम फेरीमध्येही विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच झाली. ५१ महाविद्यालयांच्या संघांनी एकांकिकांचे सादरीकरण केले. त्यातील सर्वोत्तम ९ महाविद्यालयांच्या संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
अंतिम फेरीत या संघांचे सादरीकरण पाहता येणार
शनिवारी (दि.१७) सायंकाळी पाच ते रात्री आठ यावेळेत फर्ग्युसन महाविद्यालय (आद्य), मॉर्डन कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय (गाभारा) आणि मॉर्डन महाविद्यालय, गणेशखिंड (अहो, ऐकताय ना?) हे संघ सादरीकरण करणार आहेत. रविवारी (दि.१८) सकाळी ९ ते दुपारी 12 यावेळेत टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय (काय झाडी, काय डोंगार, काय हाटील), कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय (चाराणे) आणि पीआयसीटी महाविद्यालय (कलिगमन) या महाविद्यालयांचे संघ सादरीकरण करतील. याच दिवशी सायंकाळी पाच ते रात्री आठ यावेळेत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती (भू भू), डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी (एक्सपायरी डेट)आणि अभियांत्रिकी महाविद्यालय (ओंजळभर चंद्र) या महाविद्यालयांच्या संघांचे सादरीकरण पाहता येणार आहे.