लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘केअर टेकर’ म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनेच घरातील महिलेवर धारदार शस्त्राने वार करत अकरा लाख रुपये लुटल्याची घटना पुणे शहरात घडली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. नर्सेस ब्युरोची नोंदणी, केअर टेकरची विश्वासार्हता याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
ज्येष्ठ नागरिक किंवा आजारी व्यक्तीची सेवा करण्यासाठी नर्सेस ब्युरोंच्या माध्यमातून नर्स किंवा ‘केअर टेकर’चा पुरवठा केला जातो. पुण्यात साधारणपणे ५ ते ६ हजार ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. अनेक घरांमध्ये पती-पत्नी नोकरी करणारे असल्याने ज्येष्ठांना सांभाळण्यासाठी एजन्सीच्या माध्यमातून केअर टेकर नेमले जातात. शहरात शेकडोंच्या संख्येने नर्सेस ब्युरो सुरु झाले आहेत. त्यापैकी अनेक ब्युरोंची नोंदणी नसल्याने त्यांच्यावर ‘वॉच’ ठेवणे अवघड असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
नर्सिंग ब्युरोला महाराष्ट्र नर्सिंग काऊन्सिलकडे नोंदणी करावी लागते. नर्सिंग ब्युरो अनेक रुग्णालयांशीही संलग्न असतात. प्रशिक्षित नर्सची नेमणूक करण्यावर भर दिला जातो. मात्र, केवळ केअर टेकर पुरवणारी एजन्सी चालवायची असेल तर शॉप अॅक्ट लायसन्स काढून एजन्सी सुरु करता येते. शॉप अॅक्ट काढण्याची प्रक्रिया सोपी असल्याने एजन्सीची संख्या अनियंत्रितपणे वाढत आहे. मात्र त्यांची विश्वासार्हता कोण निश्चित करणार या प्रश्नाचे उत्तर सरकारी स्तरावरुन दिले जात नाही.
चौकट
“नर्स किंवा आयांचे आधार कार्ड, फोटो, पूर्ण पत्ता अशी पूर्ण माहिती घेतली जाते. त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यांना एक वही दिलेली असते. त्यावरही त्यांचा फोटो, मोबाईल नंबर, ब्युरोचे स्टिकर, आधार कार्ड नंबर, पत्ता ही माहिती भरलेली असते. परकी बाई घरी येत असल्याने रुग्णांनी सावध रहावे, मौल्यवान वस्तू, पैसे बाहेर ठेवू नयेत, कपाटाला हात लावू देऊ नये अशा सूचना देणारे माहितीपत्रक रुग्णांकडे दिलेले असते. बायकांनाही प्रशिक्षण दिलेले असते. बाई घरातून बाहेर निघताना त्यांचे सर्व सामान तपासावे, असेही सांगितलेले असते. बायकांचे पोलीस व्हेरिफिकेशन त्यांच्याच भागातील पोलीस स्टेशनमध्येच झाल्यास प्रक्रिया सोपी होऊ शकते.”
- वृंदा दाते, दाते नर्सिंग ब्युरो
---------------------------
पुण्यात ५ ते ६ हजार नागरिक एकटे राहतात. त्यांना नर्स किंवा केअर टेकरची गरज भासते. त्यांना कोणतीही शंका आल्यास, अडचण आल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास १०९० या हेल्पलाईनवर भरोसा सेलशी संपर्क साधावा. जवळच्या पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी त्वरित मदतीसाठी येऊ शकतात.
- अरुण रोडे, ज्येष्ठ नागरिक संघ