अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 08:08 AM2024-05-26T08:08:33+5:302024-05-26T08:08:49+5:30
कोणाची जाणार खुर्ची? पदाधिकारी आले फुल्ल टेन्शनमध्ये
दीपक जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सुपे (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक दोन्ही पवार गटांमुळे अटीतटीची झाली. आता खरी उत्सुकता आहे निकालाची. जर पदाधिकाऱ्यांच्या गावातून घड्याळाला मतदान कमी झाले तर त्याला खुर्ची सोडावी लागणार आहे. तशी तंबीच दिली गेल्याने अनेक पुढाऱ्यांनी आतापासूनच निकालाचे टेन्शन घेतले आहे.
यावेळची निवडणूक ही प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या हातात घेतल्यासारखी झालेली होती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या गावातून मतदान कसे झाले आहे, त्यात घड्याळाला किती टक्के झाले, त्यानुसार प्रत्येक पदाधिकाऱ्यांची खुर्ची अबाधित राहणार की जाणार, हे ठरणार आहे. या चर्चेनेच जोर धरला असल्याने येत्या ४ जूनलाच अजित पवार यांच्या रडारवर नक्की कोणकोणता पदाधिकारी येतोय हे पाहावे लागणार आहे.
कानोसा घेतला
१९ मे रोजी अजित पवार यांनी बारामतीचा दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली. त्यावेळी सहयोग या निवासस्थानी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मतदान कसे झाले आहे, याची खात्री करून घेतली.
दगाबाज पिलावळींची खैर नाही; जनसंवाद सभेतच दिले होते संकेत
- सुपे येथे झालेल्या जनसंवाद सभेत अजित पवार यांनी पिलावळीचा मला दोष का देता. त्यांचे स्थानिक स्वराज्य निवडणुकीदरम्यान पाहू, असे म्हटले होते.
- आता मला भरघोस मतांनी निवडून द्या, असे भावनिक आवाहन देखील केले होते.
- तालुक्यात पिलावळीमुळे जर दगाफटका झाला तर त्यांची हयगय करणार नाही, असा दमही पदाधिकाऱ्यांना दिला होता.