साचलेल्या पाण्यातून चालताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खडकी बाजारात मध्यंतरी सर्वत्र रस्ते खोदून विविध प्रकारचे पाइपलाइनचे काम करण्यात आले होते. त्यावेळी ठेकेदारांनी घाईगडबडीत कामे उरकून माती टाकून खड्डे बुजवले होते. त्यानंतर अद्यापपर्यंत खडकी बाजारातील अनेक ठिकाणी ते खड्डे आहे त्याच अवस्थेत आहेत. मात्र, ते खड्डे का बुजवण्यात आले नाही याबाबत खडकीतील नागरिकांनी अनेक वेळा बोर्डाकडे विचारणा केली. त्यानंतर पावसाळा सुरू होऊन एक महिना होत आला. अद्यापपर्यंत ते खड्डे बुजवण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी त्या खड्ड्यात पाणी साचून मातीमिश्रित पाणी रस्त्यावर सर्वत्र पसरत असून, काही ठिकाणी त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खडकी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलजवळ सुरेश गांधी चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून मोठं तळ निर्माण होते. त्याच ठिकाणावर अनेक शाळा व महाविद्यालय आहेत. तसेच कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलला जाण्यासाठीही तेथूनच जावे लागते. येथून जाताना विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे खड्डे लवकरात लवकर बुजवून योग्य ती काळजी घ्यावी, अशी मागणी खडकीतील नागरिक करीत आहे.
.......
चौकट : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत पुणे महापालिकेतर्फे पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होते. ते काम पूर्ण झाले, मात्र त्यांनी केलेले खड्डे व्यवस्थित डांबर टाकून बुजवण्याचे कामही त्यांचेच होते, ते त्यांनी केले नाही. हे काम खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नसून महापालिकेचे आहे. - प्रेमप्रकाश वरंदानी - मुख्य अभियंता, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड
...........
चौकट : आता प्रश्न असा पडतो की, महापालिकेकडून ते खड्डे बुजून घेण्याचे काम कोणाचे होते. अर्थातच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांचे होते. आता बोर्डाचे अधिकारीही हात वर करून आपली जबाबदारी झटकत आहे. यामध्ये खडकीकरांचे हाल होत असून, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह या प्रकरणात लक्ष घालणार का? याकडे आता समस्त खडकीकरांचे लक्ष लागले आहे.