पुणे : मी ५२ वर्षांपूर्वी एकाच मुलीवर (सुप्रिया सुळे) कुटुंब नियोजन केल्यावर मलाही अनेकांनी प्रश्न विचारले. ‘निवडणुकीच्या वेळी तुम्हाला एकच मुलगी का?’ या प्रश्नाला सामोरे जावे लागले. एकदा मला प्रचारावेळी विचारले गेले, एकच मुलगी मग अग्नी कोण देणार? म्हणजे लोकांना अग्नी कोण देणार याची काळजी. मात्र, मला ती काळजीच नव्हती; कारण, मुलगी सगळे करू शकते, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
पुणे डॉक्टर असोसिएशनच्या ‘सिंगल डॉक्टर फॅमिली’ उपक्रमाच्या प्रारंभप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची संयुक्त मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी एका मुलीवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या दोनशे डॉक्टर दाम्पत्यांना निमंत्रित केले होते. पुणे डाॅक्टर्स असाेसिएशनचे डाॅ. नीलेश जगताप, मुख्य विश्वस्त सुनील जगताप उपस्थित हाेते.
पवार यांनी आईच्या आठवणींनाही उजाळा दिला. ते म्हणाले, माझ्या कुटुंबातील सर्व संस्काराचे श्रेय आईला आहे. आमच्या पिढीत सगळेच उच्चशिक्षित झाले ते आईमुळेच. त्यामुळे महिलांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. सुप्रिया राजकारणात पडेल असे मला वाटत नव्हते. मात्र, ती राजकारणात आली व तिनेदेखील सिद्ध केले, असेही ते म्हणाले.
विधानसभा आणि लोकसभेत महिला सदस्यांची संख्या वाढवायची असेल तर..? काय करायला हवे, असे पवार यांना विचारले असता, ते म्हणाले की, समाजाची मानसिकता बदलायला हवी. लोकसभा आणि विधानसभा इथे महिलांची संख्या कमी आहे, कारण महिला निवडून येईल अशी खात्री अनेकांना वाटत नाही. तसेच आली तर काम करेल का? अशी मतदारांची मानसिकता आहे, असेही पवार म्हणाले.
सुप्रिया म्हणाल्या की, मी आईकडून पेशन्स घेतले आहेत. वडील खूप स्ट्राँग आहेत. कुठलाही प्रस्ताव आल्यास त्यावर काय बोलायचे त्याचा मी अभ्यास करते. त्यानंतरच तो संसदेत मांडत असते.