पिंपरी : शहरात बनावट हेल्मेटविक्रेते रस्त्या-रस्त्यावर दिसत आहेत. अप्रमाणित बनावट हेल्मेट विकून दुचाकीस्वारांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबविण्याबाबत कोणतेच प्रशासन पुढे येत नाही. आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलत हात झटकण्याचा प्रयत्न होत असल्याने अशा विक्रेत्यांची चलती वाढली आहे. फेबु्रवारी महिन्याच्या पहिला आठवड्यात पोलिसांनी दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे करीत, कारवाईचा धडका लावला होता. दंडाच्या रकमेमुळे दुचाकीस्वार त्रस्त झाले होते. पुढे ही कारवाई स्थगित केली गेली. मात्र, अधूनमधून काही रस्त्यांवर हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारावर कारवाई केली जात आहे. पोलिसी कारवाई आणि दंडाच्या भीतीने दुचाकीचालक हेल्मेट वापरत आहेत. त्यामुळे मागणी वाढली आहे. याचा फायदा उचलत रस्त्या-रस्त्यांवर आयएसआय मानांकन नसलेले बनावट अप्रमाणित हेल्मेटविक्री सर्रासपणे केली जात आहे. तसेच, दुकान आणि टपऱ्यांमध्ये असे हेल्मेट उपलब्ध आहेत. दोनशे ते पाचशे रुपये किमतीचे हे स्वस्तातील हेल्मेट नागरिक वापरत आहेत. अपघातामध्ये हे गुणवता नसलेले अप्रमाणित हेल्मेट कुचकामी ठरत आहेत. हेल्मेट तुटून डोक्याला इजा होऊन गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. या संदर्भात ‘लोकमत’ने ठळकपणे वृत्त प्रसिद्ध केले आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत महापालिका प्रशासन, दुकान निरीक्षक कार्यालय (शॉप अॅक्ट लायसन्स), उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), वाहतूक पोलीस, पोलीस जबाबदारी घेत नाहीत. एकमेकांकडे बोट दाखवीत आपली जबाबदारी ढकलत आहेत. महापालिका प्रशासन म्हणते, हेल्मेट बनावट की खरे, हे कसे ओळखणार? या संदर्भात ग्राहक कक्षाकडे नागरिकांनी तक्रार केली पाहिजे. कोणी आमच्याकडे तक्रार दिली, तर पोलिसांना सांगून कारवाई करता येईल. रस्त्यांवर अनधिकृतपणे विक्री करीत असल्याचे आढळल्यास महापालिका कारवाई करेल. विक्रेत्यांना महापालिका प्रशासन कोणतेही परवाने देत नाही. दुकान निरीक्षक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते, एका ठिकाणी स्थायिक असलेल्या दुकानांना शॉप अॅक्ट परवाना दिला जातो. फिरत्या विक्रेत्यांना असा परवाना दिला जात नाही. त्यामुळे रस्त्यावर हेल्मेट विकणाऱ्यांना नियमानुसार परवाना देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. महापालिका प्रशासन फिरत्या विक्रेत्यांना परवाने देते. त्यांनी अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी. आरटीओ अधिकाऱ्यांनी आपले हात सपशेल झटकले. बनावट हेल्मेट विक्रेत्यांवर आरटीओ कारवाई करू शकत नाही. शॉप अॅक्ट कार्यालयाने अशा लोकांवर कारवाई करावी, असे सांगून ते मोकळे झाले. अशा विक्रेत्यांवर कारवाईचे थेट अधिकार वाहतूक पोलिसांना नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तक्रार आल्यास कारवाई केली जाईल. अशा प्रकारे सर्व विभागांनी आपली जबाबदारी झटकत हात वर केले आहेत. त्यामुळे शहरात कोठेच कारवाई होत नाही. परिणामी, बनावट हेल्मेट विक्रेते सर्रासपणे आपला धंदा करीत नफा कमवीत आहेत. दुकान निरीक्षक बेग यांनी सांगितले, ‘‘स्थिर जागेवरील दुकानदारांना दाखला दिला जातो. रस्त्यांवरील विक्रेत्यांना पालिकेकडून दाखला घ्यावा लागतो. विनादाखला विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा अधिकार महापालिका व पोलिसांना आहे. त्या विभागाने पाहणी करून कारवाई करावी.’’(प्रतिनिधी)
बनावट हेल्मेट विक्रेत्यांना रोखणार कोण?
By admin | Published: March 03, 2016 1:26 AM