केडगाव (पुणे) : आपल्या मुलाने नात्यागोत्यातील विवाहित मुलगी पळवून आणल्याने कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने निघोज (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील मोहन पवार व जावई श्याम फुलवरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तब्बल सातजणांनी पारगाव (ता.दौंड) येथे भीमा नदीच्या पात्रात आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. गेल्या सात दिवसांपासून नदीपात्रात रोज एक मृतदेह आढळून येत होते. मंगळवारी तीन चिमुकल्यांचे मृतदेह मिळून आल्याने हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले.
मूळचे बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील असणारी ही कुटुंबे भटकंती व्यवसाय करत असल्याने सध्या निघोज, ता. पारनेर येथे राहत होती. भीमा नदीमध्ये गेल्या सहा दिवसात सात मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज तीन चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले व शोधमोहीम यंत्रणेला पूर्णविराम मिळाला.
हृदय पिळवटून टाकणारी घटना पारगाव, तालुका दौंड येथे १७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार मयत मोहन उत्तम पवार (४५, रा. मूळ गाव खामगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांचा मुलगा अमोल याने नात्यातील एक विवाहित मुलगी पळवून आणली होती. ही गोष्ट मोहन पवार व त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हती. त्यामुळे मोहन पवार यांनी आपला दुसरा मुलगा राहुल पवार (रा. पुणे) याला फोनवरून याबाबत कल्पना दिली व अमोलने संबंधित विवाहित मुलगी परत तिच्या घरी नेऊन सोडावी याबाबत आग्रह धरला, तसे न केल्यास आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. परंतु अमोल आपल्या निर्णयावर ठाम होता. त्याने वडिलांचे म्हणणे ऐकलेच नाही यामुळे मोहन पवार व त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्यामुळे या घटनेने निराश झालेल्या पवार यांच्यासह जावई फुलवरे यांच्या कुटुंबातील एकूण सातजणांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. मृतांमध्ये मोहन पवार यांची पत्नी संगीता मोहन पवार (४०), मोहन पवार यांची मुलगी राणी श्याम फुलवरे (२४, मूळ गाव हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), जावई श्याम पंडित फुलवरे (२८) व नातू रितेश श्याम फुलवरे (७), छोटू श्याम फुलवरे (५), कृष्णा श्याम फुलवरे (३) यांचा समावेश आहे.
पारगाव (ता. दौंड) येथील मच्छीमार भानुदास शिंदे यांना सर्वप्रथम एक मृतदेह तरंगत असल्याची बातमी समजली. त्यांनी तात्काळ सरपंच जयश्री ताकवणे यांच्यामार्फत यवत पोलिसांशी संपर्क साधला. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या बचाव पथकाने दोन दिवसांत सर्व मृतदेह बाहेर काढले. सर्वांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांच्या अंगावरती कसल्याही खुणा आढळल्या नाहीत त्यावरून त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्या तीन चिमुकल्यांचा काय दोष?
या सर्व प्रकरणामध्ये आत्महत्या करणाऱ्यांपैकी तिघेजण अल्पवयीन चिमुकले आहेत. या तीन चिमुकल्यांना किंबहुना आत्महत्या करायची याची कल्पनाही नसावी. खरे तर या वयामध्ये शिक्षण घेणे अपेक्षित होते; परंतु भटकंतीचा व्यवसाय असल्याने शिक्षण घेता आले नाही. अज्ञानामुळे किंवा अशिक्षितपणामुळे कुटुंबीयांनी आपल्यासोबत या तिघांचा बळी घेतला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज भीमा नदी काठावर पवार व फुलवरे कुटुंबातील तिघे सदस्य उपस्थित होते .त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.