डॉ. नानासाहेब थोरात : अमेरिकेच्या नॅशनल अँकेडमी ऑफ सायन्सच्या जर्नलमध्ये संशोधन प्रसिद्ध
शास्त्रज्ञांचे संशोधन : जगाला वाकवणारा विषाणू आहे १००-१५० नॅनोमीटरचा
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूने गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग वेठीस धरले आहे. जग थांबवणारे हे विषाणू आहेत तरी किती? संशोधन सांगते की संसर्ग झालेल्या एका व्यक्तीत साधारणत: दहा हजार कोटी विषाणू असतात. वजनात मोजायचे तर फक्त शंभर मायक्रोग्रॅम म्हणजेच एका मिलिग्रॅमपेक्षाही दहा पटीने कमी. म्हणजेच या घडीला जगभरातल्या सगळ्या कोरोनाबाधितांमधल्या सगळ्या विषाणूंचे वजन एकत्र केले तर ते जास्तीत जास्त भरेल अवघे १० किलो.
कोरोना विषाणूपेक्षा फुप्फुसातील पेशी हजारो पटींनी मोठ्या असतात. फुप्फुसातील एका पेशीत किमान पाच ते दहा हजार कोरोना विषाणू सहज राहू शकतात. एवढ्या छोट्या कोरोना विषाणूचे आकारमान शोधण्यात इस्रायल आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांना यश आले आहे. जगाला वाकवणाऱ्या एका कोरोना विषाणूचे वजन शंभर ते दीडशे नॅनोमीटर असल्याचे त्यांचे संशोधन आहे. म्हणजे किती? तर...एका कोरोना विषाणूचा आकार आहे एका मीटरच्या नऊ कोटीव्या भागाइतका अतिसूक्ष्म.
इस्रायलमधील वाईझमॅन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या आकाराचे संशोधन केले आहे. अमेरिकेच्या नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सच्या जर्नलमध्ये ते प्रसिद्ध झाले आहे.
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी या संदर्भात ‘लोकमत’ला सांगितले, “साहजिकच एवढा अतिसूक्ष्म विषाणू उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. त्यासाठी अद्ययावत सूक्ष्मदर्शक वापरला जातो. या सूक्ष्मदर्शकाची किंमत अंदाजे दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तो ठेवण्यासाठीही दोन कोटी रुपयांचा कक्ष तयार करावा लागतो. अमेरिका, चीन, जपान आणि काही युरोपीय देशांमध्ये असे सूक्ष्मदर्शक आहेत. यातून शंभर ते दीडशे नॅनोमीटर एवढ्या लहान आकाराचा कोरोना विषाणू पाहता येतो. शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार एका व्यक्तीला सुरुवातीला संसर्ग होतो तेव्हा त्याच्या शरीरात शंभर कोटींच्या आसपास विषाणू असतात. संसर्ग खूपच वाढला तर विषाणूंची ही संख्या एक हजार ते दहा हजार कोटीपर्यंत जाते.
चौकट
संसर्गाचे टोक म्हणजे कोटी विषाणू
शास्त्रज्ञांच्या प्रयोगातून तयार केलेल्या मॉडेलनुसार फुप्फुसामधील जास्तीत जास्त एक कोटी पेशींना कोरोना विषाणूचा संसर्ग होतो. आपल्या शरीरात एकूण ३ ट्रिलियन पेशी असतात. सुरुवातीच्या संसर्गामध्ये फक्त दहा विषाणू एका पेशीत प्रवेश करतात. संसर्गाच्या अत्युच्य पातळीवर ही संख्या वाढून कोरोना विषाणू एक कोटी पेशींना संसर्गित करतात. त्या वेळी एका पेशीमध्ये सरासरी एक हजार ते दहा हजार विषाणू असू शकतात.
विषाणूने शरीरात प्रवेश केल्यावर आपली प्रतिकारशक्ती या विषाणूला बाहेर काढण्यासाठी प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार करते. प्रतिपिंडे तयार होण्याचे प्रमाण रक्तामध्ये सर्वाधिक असते तर फुप्फुसामध्ये फार कमी असते. त्यामुळेच जेव्हा कोरोनाचा संसर्ग फुप्फुसांमध्ये पसरतो तेव्हा तो रोखणे अवघड होते. एका विषाणूवर एक हजारापेक्षा जास्त प्रतिपिंडे चिकटलेली असतात. दहा विषाणूंवर शंभर प्रतिपिंडे जाऊन चिकटली तरी विषाणूंची संख्या वाढतच जाते. दहा हजारांपासून दहा कोटी पेशींना संसर्ग करून विषाणू स्वतःची संख्या शंभर कोटींपेक्षा अधिक करतो, तेव्हासुद्धा त्याचे वजन फक्त काही मायक्रोग्रॅम असते.
- डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ
चौकट
आकारमानाचा खटाटोप का?
कोणत्याही विषाणूजन्य साथरोग रोखण्यासाठीची लस तयार करताना संबंधित विषाणूचे निष्क्रिय कण वापरले जातात. या कणांचे प्रमाण किती असले पाहिजे, किती कणांवर लसीचा काय परिणाम होतो, माणसाला लसीचा डोस किती द्यावा लागेल हे समजण्यासाठी विषाणूचे आकारमान जाणून घ्यावे लागते.