Narendra Modi in Pune Metro: पुण्याच्या मेट्रोसाठी कोणाचे प्रयत्न? अजितदादा म्हणतात गडकरी, तर मोदी म्हणतात फडणवीसांमुळे... भर व्यासपीठावर श्रेयवाद रंगला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 06:17 AM2022-03-07T06:17:53+5:302022-03-07T06:18:28+5:30
Narendra Modi in Pune Metro: मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर एमआयटी विद्यापीठाच्या प्रांगणात झालेल्या सभेत पंतप्रधानांचे बहुतांश भाषण अराजकीय होते. मात्र, मेट्रोच्या श्रेयावरून राजकारण रंगले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर एमआयटी विद्यापीठाच्या प्रांगणात झालेल्या सभेत पंतप्रधानांचे बहुतांश भाषण अराजकीय होते. मात्र, मेट्रोच्या श्रेयावरून राजकारण रंगले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोचा प्रश्न केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे मिटल्याचा उल्लेख केला होता, मात्र त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोसाठी प्रयत्न केल्याचे सांगितले.
मोदी म्हणाले, मेट्रोच्या कामाविषयी अडचण आल्यास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत येत असत. मात्र, त्यांच्या अगोदर झालेल्या भाषणात उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पुण्यात मेट्रो धावण्यासाठी १२ वर्षे लागली. हे काम होत असताना पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल त्यांच्या सहनशक्तीला सलामच केला पाहिजे. पुण्यातील मेट्रो उन्नत असावी की भुयारी, यावर चर्चा होत होती. मात्र मार्ग निघत नव्हता. त्यावेळी नितीन गडकरी यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्यामुळेच मेट्रोचा प्रश्न सुटला.
पुण्यात नदी उत्सव साजरा व्हावा
nनद्या पुन्हा स्वच्छ झाल्या तर नागरिकांना नवी ऊर्जा मिळेल. पुण्यात एक दिवस ठरवून वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा व्हावा. त्यातून पर्यावरण प्रशिक्षणाची सवय लागेल. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे, नदीचे महत्त्व समजेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
nते म्हणाले, पुण्याची ओळख प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक शहर अशी होत आहे. स्थानिक यंत्रणांनी स्वच्छतेवर भर द्यावा. मुळा-मुठा नदीची स्वच्छता व सुशोभीकरणासाठी केंद्र सरकार महानगरपालिकेला पूर्ण साहाय्य करत आहे.
कोरोना साथ काँग्रेसमुळे देशात पसरल्याच्या वक्तव्याचा निषेध
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडून महाराष्ट्रद्रोह वारंवार केला जात आहे. नैसर्गिक संकट अथवा कोविडची साथ महाराष्ट्राला मदत देताना मोदी सरकारने अन्याय केला आहे. लोकसभेतील भाषणात बोलताना पंतप्रधानांनी कोरोना साथ महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे देशात पसरली, असे संतापजनक विधान केले. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून रविवारी सकाळी जोरदार निदर्शने केली.
nपंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्रद्रोही भूमिकेचा निषेध करण्यासाठी लोकमान्य टिळक चौकात काँग्रेस पक्षाचे काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. ‘मोदी गो बॅक’
असे फलक दाखविण्यात आले.