विधानसभेच्या रणांगणात इंदापूरची जागा कोणाच्या पारड्यात पडणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 07:04 PM2019-09-10T19:04:45+5:302019-09-10T19:08:14+5:30
लोकसभेला आम्हाला मदत करा, विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा सोडतो असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांना दिले होते.
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदापूरच्या जागेवरुन चांगलेच नाट्य पाहायला मिळत आहे. हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्याने आता या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचंड ताकद लावली जाणार आहे. भाजपकडून जरी याबाबत कोणताही अधिकृत दावा करण्यात आला नसला तरी शिवसेना व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याकडून या जागेविषयी सातत्याने आवाई उठवली आहे. त्यामुळे ही जागा महायुती व आघाडी यांच्यात नेमक्या कुणाच्या पारड्यात पडणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील काहीसे नाराज दिसून येत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह पाटील यांचा होता. आघाडीच्या जागा वाटपातही या जागेवर चर्चा सुरू होती. मात्र, काही दिवसांपूर्वी इंदापूरचा कुठलाही नियोजित दौरा नसताना राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आणण्यात आली. त्यात शिरुरचे खासदार व स्वराज्या यात्रेची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्या डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमोरच कार्यंकर्त्यांचा धिंगाणा पाहायला मिळाला. आणि तिथेच हर्षवर्धन पाटील यांच्या मनात इंदापूरच्या जागेविषयी धोक्याची घंटा वाजू लागली. आणि त्याचसोबत अजित पवारांच्या छुप्या मनसुब्याची एकप्रकारे चाहुल लागली. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी तातडीने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजित केला.त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर धणाघाती टीका केली. लोकसभेला आम्हाला मदत करा, विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा सोडतो असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने दिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला विश्वासघात केला गेला असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला होता. तसेच या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे तोंडभरुन कौतुकही केले. त्याचबरोबर कार्यकर्त्यांकडून पुढील राजकीय दिशेचे सुतोवाच देखील वदवून घेतले. तिथेच पाटील काँग्रेसला रामराम ठोकणार हे निश्चित झाले होते. दहा सप्टेंबरपूर्वी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. फक्त महायुतीतून लढणार की अपक्ष एवढीच उत्सुकता बाकी होती. मात्र, बुधवारी ते भाजपवासी होणार असल्याने आता खºया अर्थाने इंदापूरच्या जागेबाबत रंगत निर्माण झाली आहे.
इंदापूरच्या जागेबाबत उत्सुकता
हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाणार आहेत. त्यामुळे आता इंदापूरच्या जागेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाकडून काय पावले उचलली जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण ‘रासप’ने या जागेवर दावा केला होता. तसेच इंदापूरसाठी आग्रही राहू, असे महादेव जानकर यांनी देखील स्पष्ट केले होते. हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी ‘रासप’ जागा सोडणार का ? याबाबत उत्सुकता वाढली आहे.
* हर्षवर्धन पाटलांसमोरचे आव्हान
गेल्या निवडणुकीत पाटील यांना दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र आगामी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी देशातील व राज्यातील राजकीय हवा ओळखून नव्या दिशेने पाऊल टाकले आहे. भाजपात प्रवेश केल्यावर शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या मन वळ्वण्यासोबत मतदारसंघातील धनगर आणि मराठा समाजाचे प्राबल्य असल्याने त्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विकासाचे ठोस मुद्दे घेऊन मतदारांसमोर जावे लागणार आहे.